महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची गणितं पुन्हा एकदा बदलू शकतात, असे दावे केले जात आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचं दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्यासोबत जाऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर देताना संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही भक्कमपणे त्यांच्यासोबत उभे राहू, तसेच आम्हाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असून तो कायम राहील, असं विधान केलं होतं. संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये गोंधळ उडाला आहे. तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आता संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, त्याचं असं आहे की, एकनाथ शिंदे हे स्वत: असं म्हणाले आहे का? अजित पवार असं म्हणाले आहेत का? किंवा देवेंद्र फडणवीस हे असं काही म्हणाले आहेत का? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे युतीचे प्रमुख नेते आहेत आणि ते जे काही म्हणतात तेच ब्रह्मवाक्य ठरतं. बाकी कुणी काह म्हणतं याला महत्त्व नाही. तसेच तिकडे जाण्यामध्येही अनेक अडथळे आहेत. तिकडे कुठे उद्धव ठाकरे आहेत तर कुठे शरद पवार बसलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून बोललं पाहिजे, असा टोला छगन भुजबळ यांनी संजय शिरसाट यांना लगावला.