नाशिक - उद्धवसेनेचे नाशिक मध्यमधील उमेदवार व माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयात येत ईव्हीएम मशीन हॅक करीत तुम्हाला विजयी करून देतो, त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील, पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या भामट्याला पोलिसांनी ४ तासांत ताब्यात घेतले.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता मुंबई नाका येथील उमेदवाराच्या कार्यालयात भगवानसिंग चव्हाण हा परप्रांतीय युवक आला. कार्यालयातील आनंद शिरसाठ यांना ‘मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून १० मतदानापैकी ३ ते ४ मते तुम्हाला मिळवून देऊन निवडणुकीमध्ये जिंकून देताे. बदल्यात ४२ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यापैकी ५ लाख आता द्यावे, अशी मागणी केली. पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पैसे न दिल्यास प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमचा उमेदवार पराभूत करेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर तो पत्ता सांगून निघून गेला. शिरसाठ यांनी याप्रकरणी बुधवारी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पाेलिसांनी भगवानसिंगला उचलले.
पैसे कमविण्याचा फंडा...निवडणुकांमध्ये पैसे कमविण्याची संधी पाहून आपण हा प्रकार केल्याचे त्याने कबूल केले. भगवानसिंग चव्हाण (३४, रा. गोगरा अजमेर, राज्य राजस्थान, सध्या रा. विठूमाऊली कॉलनी, म्हसरूळ लिंक रोड) १५ ते २० दिवसांपूर्वीच शहरात रोजगाराच्या निमित्ताने शहरात आला हाेता.