हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही Exit Poll फसणार?; आकडे चुकण्याचा इतिहास पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 10:01 AM2024-11-21T10:01:56+5:302024-11-21T10:35:48+5:30
एक्झिट पोल हा निवडणूक सर्व्हे असतो, ज्यात मतदानानंतर काही मतदारांशी संवाद साधून निवडणुकीचे काही प्रश्न विचारले जातात, त्यांच्या उत्तरांच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जातो
मुंबई - महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान पार पडले. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी दिवशी निकाल स्पष्ट होतील. परंतु त्याआधी विविध न्यूज चॅनेलकडून एक्झिट पोट दाखवण्यात आले आहेत. त्यात जवळपास महायुती पुन्हा सत्तेत येईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे. परंतु एक्झिट पोल हा निकाल नसतो. याआधी अनेकदा एक्झिट पोल अपयशी ठरले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज दिला आहे तर काहींनी काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी आशा दाखवली आहे. न्यूज १८ मॅट्रीजच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील २८८ पैकी महायुतीला १५०-१७० जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. या सर्व्हेत काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीला ११०-१३० जागा मिळतील असं भाकीत वर्तवण्यात आले आहे.
पी-एमआरक्यूच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला १३७-१५७ जागा मिळण्याचे अंदाज आहेत तर महाविकास आघाडीला १२६-१४६ जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य स्ट्रॅटजीजच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला १५२-१६० जागा तर महाविकास आघाडीच्या खात्यात १३०-१३८ जागा येण्याची शक्यता वर्तवली आहे. पोल ऑफ पोल्समध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला १४६ जागा तर काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीला १२९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय पोल ऑफ पोल्सनं इतरांच्या खात्यात १३ जागा दाखवल्या आहेत.
हरियाणात सगळे एक्झिट पोल खोटे ठरले
मागील महिन्यात हरियाणा विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर मतदान संपल्यावर सर्व चॅनेल्सने एक्झिट पोलचे आकडे दाखवले. ज्यात बहुतांश एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेस सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात समोर आलेल्या आकडेवारीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. याठिकाणी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आली. केवळ हरियाणातच नाही तर लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळाले. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला बहुतांश संस्थांनी ३५० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला परंतु प्रत्यक्ष निकालात भाजपाची पिछेहाट झाली आणि २३० जागांवर विजय मिळाला. त्याशिवाय महाराष्ट्रातील अनेक एक्झिट पोलमध्ये लोकसभेला महायुतीला जास्त जागा दाखवण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष निकालात महाविकास आघाडी सरस ठरल्याचे दिसून आले.
काय असतात Exit Poll?
एक्झिट पोल हा निवडणूक सर्व्हे असतो, ज्यात मतदानानंतर काही मतदारांशी संवाद साधून निवडणुकीचे काही प्रश्न विचारले जातात, त्यांच्या उत्तरांच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जातो. त्यातून मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे हे कळते. एक्झिट पोल जारी करताना त्या संस्थेचे नाव, किती मतदारांशी संवाद साधला, काय प्रश्न विचारले हे सर्व सांगणे बंधनकारक असते.