आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 10:34 AM2024-11-15T10:34:12+5:302024-11-15T10:49:46+5:30

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये धुसफूस असल्याचे दावे केले जात आहेत. काल मुंबईत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये अजित पवार हे अनुपस्थित होते. एवढंच नाही तर अजित पवार गटाचा कुठलाही बडा नेताही या सभेत सहभागी झाला नाही.

Maharashtra Assembly Election 2024: First, opposition to 'Batenge to Katenge', now Modi's rally, what is going on in Ajit Pawar's mind?   | आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  

आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आता टिपेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून आपापल्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यादरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये धुसफूस असल्याचे दावे केले जात आहेत. काल मुंबईत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये अजित पवार हे अनुपस्थित होते. एवढंच नाही तर अजित पवार गटाचा कुठलाही बडा नेताही या सभेत सहभागी झाला नाही.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा झाली होती. त्या सभेमध्ये अजित पवार हे सहभागी झाले नव्हते. एवढंच नाही तर या सभेत अजित पवार गटाचा कुठलाही नेतासुद्धा या सभेला उपस्थित नव्हता. मात्र या सभेला शिवसेना शिंदे गट आणि आठवलेंच्या पक्षाचे नेते उपस्थित होते. आता अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. 

महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत अजित पवार हे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने देत आहेत. अजित पवार यांनी आधी त्यांच्यासोबत असलेल्या नवाब मलिक यांच्यासाठी  महायुतीसोबत पंगा घेतला होता. एवढंच नाही तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा विरोध डावलून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर सध्या उजव्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेलाही अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यात आता अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या सभेलाही अनुपस्थिती दर्शवल्याने, चर्चांना उधाण आले आहे  

अजित पवार हे भाजपा नेते आणि महायुतीबाबत अशी भूमिका का घेत आहे, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला समाधानकारक यश मिळालं नव्हतं. तेव्हा  मुस्लिम मतदारांनी अजित पवार यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्या पारर्श्वभूमीवर अजित पवार हे त्यांच्याकडील मुस्लिम मतदारांना आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी अशी भूमिका घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: First, opposition to 'Batenge to Katenge', now Modi's rally, what is going on in Ajit Pawar's mind?  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.