आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 10:53 AM2024-11-01T10:53:24+5:302024-11-01T10:54:16+5:30
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा उमेदवार विनोद शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. अस्लम शेख यांनी उमेदवारी अर्जातून खोटी माहिती दिल्याचा आरोप विनोद शेलार यांनी केला आहे.
मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा उमेदवार विनोद शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. अस्लम शेख यांनी उमेदवारी अर्जातून खोटी माहिती दिल्याचा आरोप विनोद शेलार यांनी केला आहे. असं असतानाही अस्लम शेख यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने आपण कोर्टात जाणार असल्याचे विनोद शेलार असल्याचे विनोद शेलार यांनी सांगितले आहे.
अस्लम शेख यांनी उमेदवारी अर्जामधून चुकीची आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप करताना विनोद शेलार म्हणाले की, मंत्री राहिलेली व्यक्ती, तीन वेळा आमदार राहिलेली व्यक्ती आपल्या पहिल्या निवडणुकीत बारावी अशी शैक्षणिक पात्रता दाखवते. त्यानंतरच्या निवडणुकीत नववी अशी शैक्षणिक पात्रता दाखवते. आता २०२४ मध्ये आठवी अशी शैक्षणिक पात्रता दाखवलेली आहे. हे कसं असू शकतं. एकतर ते बारावी शिकलेले असतील किंवा मग ते आठवी शिकलेले असतील. ते म्हणतात की आता माझ्याकडे आठवीचं प्रमाणपत्र आहे आणि मी आठवी शिकलेलो आहे. याचा अर्थ आधी ते खोटं बोललेले आहेत. ते आधी संविधानाशी खोटं बोलले आहेत. प्रशासनाशी खोटं बोलले आहेत. तसेच मी बारावी शिकलेलो आहे, म्हणून ते जनतेशी खोटं बोलले आहेत. त्यांची कारकीर्द २००९ पासून सुरू झालेली आहे. म्हणजे कारकीर्दीची सुरुवातच खोटं बोलून झालेली आहे. म्हणून मला वाटतं की ते खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, असा टोला विनोद शेलार यांनी अस्लम शेख यांना लगावला.
विनोद शेलार यांनी पुढे सांगितलं की, आम्ही अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर काल हरकत घेतली. त्यांचं शिक्षण नेमकं किती आहे, असा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता. सध्यातरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीमध्ये त्यांचा अर्ज वैध ठरवला आहे. मात्र आम्ही कोर्टात जाणार आहोत. बारावी पास झालेलो आहे म्हणून अस्लम शेख यांनी मालाडच्या जनतेला फसवलेलं आहे. तसेच या खोट्या आधारावरच त्यांची सगळी इमारत उभी राहिलेली आहे. तुम्ही पालकमंत्रिपदसुद्धा खोटं बोलूनच मिळवलं आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. तसेच कोर्टात जाऊन आम्ही हा विषय मांडणार आहोत, असेही विनोद शेलार यांनी सांगितले.