Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी शरद पवार गटाने ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. आतापर्यंत जाहीर केलेल्या एकूण उमेदवारांची संख्या ८७ इतकी झाली आहे. या आधी पक्षाने पहिल्या यादीत ४५ , दुसऱ्या यादीत २२, तिसऱ्या यादीत ९ तर चौथ्या यादीत ७ उमेदवार जाहीर केले होते.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील उमेदवार बदलून शिंदेसेनेतून आलेल्या राजू खरे यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. माढा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. माढ्यामधून शरद पवार गटाकडून लढण्यासाठी पाटील यांच्यासह माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील, विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, पुतणे धनराज शिंदे, हे देखील इच्छुक होते. मात्र शरद पवारांनी इथून अभिजित पाटील यांना संधी दिली. तसेच मोर्शीमधून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत तर मुलुंडमधून संगिता वाजे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार माढा : अभिजीत पाटील (नवीन चेहरा)मुलुंड : संगिता वाजे (नवीन चेहरा)मोर्शी : गिरीश कराळे (नवीन चेहरा)पंढरपूर : अनिल सावंत (नवीन चेहरा)मोहोळ : राजू खरे (नवीन चेहरा)
पंढरपूरच्या जागेवरून मविआत वादाची शक्यता पंढरपूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या आधीच काँग्रेसकडून येथे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पंढरपूरची जागा नेमकी कोणाची? यावरून मविआत वाद होण्याची शक्यता आहे.
ऐनवेळी पत्ता कट मोहोळमधून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर इथे उमेदवार बदलण्यात आला.