मुंबई - भिवंडी पूर्व मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. परंतु शेवटच्या दिवशी हा अर्ज मागे घेतला. परंतु उद्धव ठाकरे गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भिवंडी पूर्व मतदारसंघ महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघात इच्छुक असलेले रुपेश म्हात्रे गेल्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. परंतु समाजवादी पक्षाने रईस शेख यांना इथं उमेदवारी दिली. त्यात ठाकरे गटाने समाजवादी पक्षाला ही जागा सोडली म्हणून रुपेश म्हात्रे नाराज होते. रुपेश म्हात्रे यांनी कार्यकर्ता मेळावा घेत पक्षाकडून सातत्याने भिवंडीवर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्यात प्रामुख्याने वरळी आणि वांद्रे येथे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भिवंडीची जागा सोडण्यात आली. मुलासाठी आमचा बळी का असा सवाल माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी विचारला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
त्यानंतर शुक्रवारी रात्री भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व उबाठा गटाचे संपर्कप्रमुख असलेले रुपेश म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
काय म्हणाले होते रुपेश म्हात्रे?
भिवंडी पूर्व मतदारसंघात रईस शेख समाजवादी पक्षाकडून रिंगणात आहेत तर मानखुर्द शिवाजीनगर भागात अबु आझमी निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंकडून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला त्यांच्या माजी आमदारासह कार्यकर्त्यांनी विरोध करत भिवंडी पूर्व इथं अपक्ष लढण्याची तयारी केली होती. त्यात माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी म्हटलं होतं की, भिवंडीच्या बाबतीत एकदा नव्हे तर वारंवार अन्याय झाला आहे. ज्या ज्या मतदारसंघात समाजवादीची किंवा मुस्लीम मतांची आवश्यकता आहे ते वाचवण्यासाठी भिवंडीत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलंय हा माझा आरोप आहे असं त्यांनी म्हटलं होते.
दरम्यान, भिवंडीत २०१९ साली समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांचा १३०० मतांनी पराभव केला. मात्र यंदा राजकीय समीकरण बदलली आहे. त्यात शिवसेनेत २ गट पडलेत. त्यातील उद्धव ठाकरे गटाने रईस शेख यांना पाठिंबा दिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत रुपेश म्हात्रे या मतदारसंघाचे आमदार होते.