मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अदानींच्या नावाचा उल्लेख करून भाजपा महायुतीवर निशाणा साधला गेला. प्रचारात उद्धव ठाकरेंकडून वारंवार धारावी प्रकल्पाचा उल्लेख करून, मुंबई अदानींना विकायला काढल्याचा आरोप करण्यात आला. परंतु अदानींना धारावी प्रकल्पात इंटरेस्टच नव्हता, असा दावा शरद पवारांनी एका मुलाखतीत केला आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी भाजपा-राष्ट्रवादीची बैठक झाल्याचा उल्लेख केला. त्यात अमित शाह, गौतम अदानी असल्याचं म्हटलं गेले, त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, असा प्रश्न पवारांना विचारला. याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, हे काही नवीन नाही. या गोष्टीला ५ वर्ष झाली, लोकांना माहिती आहे. बैठकीचे खरे आहे, ते मी आधीच सांगितले. बैठकीसाठी मला काही नेत्यांनी विनंती केली होती. त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्यायचं होतं. शिवसेना-भाजपाचा वाद झाला होता त्यामुळे चर्चा करणे गैर काहीच नाही. राजकारणात संवाद महत्त्वाचा असतो. मी संवादावर विश्वास ठेवतो. त्यामुळे हे खरे आहे बैठक झाली होती. मी होतो, अजित पवार होते. बैठकीत आम्ही ऐकून घेतले आणि त्यानंतर आम्ही तुमचा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही, तुमच्याशी युती करू शकत नाही हे सांगितले होते.
विधानसभा निवडणूक प्रचारात मुख्यत: धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि अदानी कनेक्शनवर हल्ला चढवला होता. हा मुद्दा निवडणुकीत लावून धरला जातोय असा प्रश्न पवारांना विचारला. मात्र त्या बैठकीत धारावी मुद्दा तिथे नव्हता. अदानींना टार्गेट करण्यासाठी मुद्दा वापरला जातोय, पण धारावी प्रकल्पात अदानींना इंटरेस्टच नव्हता, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. अदानी मुद्द्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. मुंबईत विशेषतः धारावी वगळता महाराष्ट्रातील कुणीही या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असं मत मांडून शरद पवारांनी काँग्रेस-उद्धव ठाकरेंची अप्रत्यक्षपणे कोंडीच केली.
निवडणुकीला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा रंग देण्याचा प्रयत्न
राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात आहे. महाराष्ट्राला लुटलं जात आहे. धारावी प्रकल्प अदानींना देऊन मुंबई विकली जात आहे, असा प्रचार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून केला जात होता. त्याशिवाय या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा रंग देत महायुतीला आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार ऐन मतदानाच्या दिवशी 'महाराष्ट्राला अदानीराष्ट्र बनवायचा नसेल तर...' असं सांगत मतदारांना आवाहन करत आहेत. त्यात अदानी मुद्द्यांवरून शरद पवारांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे.