Maharashtra Assembly Election 2024 : सांगोला : गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना रायगडावरील टकमक टोक दाखवायचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिंदे गटावर केली. तसेच, रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला २३ तारखेचं गुवाहाटीचं तिकीट काढून द्यावं, कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्याने तिथे झाडं मोजत बसावं, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांनी लगावला होता.
रविवारी (दि.१०) सांगोल्यात शिवसेनेची (ठाकरे गट) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देत शहाजी बापू पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यापासून सत्ताधाऱ्यांना शिव्या देण्यापलीकडे ते कोणताही अजेंडा जनतेसमोर मांडत नाहीत, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
पुढे शहाजी बापू पाटील म्हणाले, मला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट उद्धव ठाकरे यांनी काढून द्यायचं ठरवलं आहे. परंतु मी गुवाहाटीला जाणार आहे. पण, रेल्वेने जाणार नाही, तर विमानाने जाणार आहे. गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्यासाठी येणार आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.
काल नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?"मी गद्दारांच्या छाताड्यांवर पुन्हा भगवा गाडायला आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. मला गद्दारांना सांगायचं की त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचं टकमक टोक बघितलं नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचं आहे", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. तसेच रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला २३ तारखेचं गुवाहाटीचं तिकीट काढून द्यावं, कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्यांनी तिथे झाडं मोजत बसावं, असे टोलाही उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांनी लगावला होता.