Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर : भाजपामुळेच राज्यात भ्रष्टाचार, बेरोजगारी अन् महागाई वाढली आहे. महायुती सरकारने दोन हजार रुपये घेऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आताचे हे महाराष्ट्राचं सरकार दिल्लीतून चालते, अशा या सरकारला जनतेनी जागा दाखवली पाहिजे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे या सोलापुरात सोमवारी (दि.१८) आल्या होत्या. त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. या सभेत सुप्रिया सुळे यानी महायुती सरकारविरोधात रोष व्यक्त करत अनेक उदाहरणे देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राज्यात भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने पोलिसांवर ताण वाढला आहे. राज्यात येणारे उद्योगधंदे गुजरातला घेऊन जात आहेत. पक्ष, नेते फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारने विकासाकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप सुप्रिया सुळे यांनी सभेत केला.
अनेक समाजाच्या आरक्षणाकडे व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे महायुतीच्या सरकारने दुर्लक्ष केल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मतदारांना पैसे वाटप केल्याचा व्हिडीओ मी पाहिला असून, निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच, या सभेला उमेदवार महेश कोठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.