Maharashtra Assembly Election 2024: अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. सर्व पक्षांच्या बैठका, जागावाटप, उमेदवार यांबाबतची लगबग सुरू झाली आहे. यातच लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे. पुन्हा आमची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन शिंदे गटातील नेत्याने दिले आहे.
लाडकी बहीण योजनेत नोंदणी करण्यात आलेल्या बहिणींना सरकारकडून आता ३ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. तसेच या योजनेविरोधात विरोधक न्यायालयात गेले आहेत. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व लाडक्या बहिणी सरकारच्या पाठिशी आहेत. ही योजना गेम चेंजर झाली आहे. परंतु विरोधक ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर याद राखा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले.
आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहिणींना ३ हजार देणार
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आश्वासन दिले. महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू नयेत, म्हणून राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले न्यायालयात गेले आहेत. पण आम्ही ठरवले आहे की, पुन्हा आमचे सरकार आले तर बहिणींना तीन हजार रुपये देणार आहोत. आमचे सरकार आले नाही, तर विरोधक ही योजना बंद करतील, हे बहिणींना माहिती आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, पैसे दिले म्हणून काहीतरी महिला बाजारातून आणायला लागल्या. ही काही साधी गोष्ट आहे का? आयुष्यात कोणाला जे जमले नाही ते आम्ही करून दाखवले आहे. या बहिणीच त्यांना आडवे करणार आहेत, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. तसेच निवडणुकीमध्ये कोणाला आपण कमी लेखत नाही. पण मला जनतेवर विश्वास आहे. मी केलेली काम आणि जनतेशी ठेवलेला संपर्क, पदावर असो की नसो आयुष्यभर मी जनतेची सेवा करता आलेलो आहे. त्यामुळे मला खात्री आहे विकासाच्या मुद्द्यावर, कार्यकर्त्यांच्या भरोशावर पुन्हा मी निवडून येईल असा मला विश्वास आहे, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.