मागच्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणातील बदलेली समिकरणं आणि महायुती व महाविकास आघाडीत झालेल्या नव्या मित्रपक्षांच्या समावेशामुळे अनेक मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अशा कोंडी झालेल्या नेत्यांकडून वेगळी वाट चोखाळण्याची तयारी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये अजित पवार गटाची एंट्री झाल्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची अशीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, आता स्वत: हर्षवर्धन पाटील यांनीही तसे संकेत दिले आहेत.
जनतेच्या मनामध्ये जे आहे, तोच निर्णय येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये घेण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. एवढा पितृपंधरवडा जाऊ द्या, मग मोठा निर्यण घेणार, असे संकेत हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हातात घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून १९९५ ते २००९ या काळात सलग चार वेळा निवडून आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत दत्ता भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, दत्ता भरणे हे सध्या अजित पवार गटात असल्याने त्यांना महायुतीकडून उमेदवाराी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे इंदापूरमधून लढण्यास इच्छूक असलेल्या हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली आहे.