नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार आणि भाजपाचेराम शिंदे यांच्यात थेट लढत रंगणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून शरद पवार गटाला अपेक्षित आघाडी मिळाली नव्हती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांनी जोमाने तयारी सुरू आहे. तसेच येथील प्रतिस्पर्धी असलेल्या राम शिंदे आणि भाजपाला त्यांनी थेट आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभा घ्या, म्हणजे मला आघाडी वाढवायला मदत होईल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, राम शिंदे यांच्या विधान परिषदेच्या कार्यकाळाची ४ वर्षे अद्याप बाकी आहेत. माझा कार्यकाळ संपला असला तरी मला पुन्हा आमदार बनवायचं हे कर्जत जामखेडमधील लोकांच्या मनामध्ये आहे. मात्र यावेळी मला मिळणारी आघाडी वाढली पाहिजे. राम शिंदे यांनी तेथील लोकांचा एमआयडीसीसह विविध प्रश्नांच्या बाबतीत लोकांचा विश्वासघात केला होता. कोरोना काळात राम शिंदे हे घरी बसले होते. अशा लोकांना मदतीची आवश्यता असताना घरी बसणाऱ्या नेत्यांना लोक या निवडणुकीत नक्कीच घरी बसवतील, असा मला विश्वास आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, माझ्यविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी लढावं, अशी मी विनंती केली होती. माझी ती इच्छा पूर्ण केली नाही. आता मी आणखी एक इच्छा व्यक्त करतो ती म्हणजे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा घ्यावी. तसेच अमित शाह यांचीही सभा घ्यावी. आम्ही मागच्या वेळपेक्षा अधिक आघाडी घेण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र हे दोन मोठे नेते जर इथे आले तर आमची आघाडी दुप्पट नाही तर तिप्पट होईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.