नाशिक - महाविकास आघाडीतीलकाँग्रेस, ठाकरेसेना आणि शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात नाशिक शहरातील चारपैकी एकही जागा काँग्रेसला सोडण्यात आली नाही. त्यामुळे इच्छुक काँग्रेस पदाधिकारी अपक्ष निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस उमेदवार हेमलता पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या नगरसेविका आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी म्हटलंय की, मी गेली ३० वर्षे कॅांग्रेस पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने करत आहे. नाशिक महापालिकेतही कार्यरत राहून नगरसेविका या नात्यानं आमची या शहराविषयी वाटणाऱ्या तळमळीतून नागरिकांचे प्रश्न सोडवित आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये माझी कोणतीही तयारी नसताना ऐनवेळी कॅांग्रेस पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आणि मी केवळ १२ दिवसांमध्ये तब्बल ४६३०० मताधिक्य घेतले. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाने मला आश्वासन दिले होते. परंतु शेवटच्या क्षणी ही जागा उबाठा गटाला सोडली. कॅांग्रेस पक्षाला संपूर्ण नाशिक शहरामध्ये चारपैकी एकही जागा वाट्याला आलेली नाही. हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं.
तसेच आगामी निवडणूक मी अपक्ष म्हणून लढण्याचा निश्चय केला आहे. ही निवडणूक माझ्यासाठी पक्ष आणि माझ्या विचारांच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची आहे. मी सदैव आपल्या सर्वांच्या सुख दुःखात सोबत असते. मला कधीच वाटले नव्हतं की अपक्ष सामोरे जावे लागेल… परंतु वेळ तशी आहे. कारण नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची गेल्या दहा वर्षात झालेली वाताहत डोळ्यांसमोर पहाताना वेदना होताहेत. गुंडगिरी, भाईगिरी, भयंकर वाहतुककोंडी, धर्माधर्मात , समाजासमाजामध्ये निर्माण झालेली तेढ, बेरोजगारी, ड्रग्जचा भयंकर विळखा, दिवसाढवळ्या नागरी वस्तीत सर्रास होणारे खून, जगण्याचे वाढत चाललेले भय आणि भय निर्माण करणाऱ्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी हे पाहता माझं नाशिक ढासळत आहे असं सांगत हेमलता पाटील यांनी सत्ताधारी भाजपा आमदारावर निशाणा साधला आहे.
नाशिकमध्ये मध्य मतदारसंघात परिस्थिती काय?
नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरेसेनेचे वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार देवयानी फरांदे यांना अद्याप पक्षाकडून तिकीट जाहीर झाले नाही. मात्र वसंत गीते यांना तिकिट मिळाल्याने नाराज काँग्रेस नेत्या हेमलता पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढण्याचं जाहीर केले आहे. महायुतीकडून फरांदेंना पुन्हा संधी मिळणार की अन्य नवा चेहरा देणार हे १-२ दिवसात कळेल. त्याशिवाय या मतदारसंघात मनसेही उमेदवार उतरवणार आहे. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.