महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक आटोपून आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली असतानाच महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गटाला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. अजित पवार गटाला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, असं विधान पक्षाच्या बैठकीत केलं होतं. त्याला आता भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. महायुतीमध्ये भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपा अधिक जागा लढवेल. मात्र सोबत असलेल्या दोन मित्रपक्षांचा पूर्ण सन्मान राखला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना छगन भुजबळ म्हणाले की, आमचे ५० ते ५४ आमदार आहेत. त्यातील दोन चार इकडे तिकडे गेले असतील. पण महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हाही त्यांनी आपल्याला ८०-९० जागा देण्याबाबत आश्वासन दिलं गेलं होतं. आला लोकसभा निवडणुकीवेळी जी काही खटपट झाली. ती पाहता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना सांगितलं पाहिजे. तेवढ्या जागा मिळाल्या तर त्यातून ५०-६० आमदार निवडून येतील.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील, त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील. पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत, त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.