महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सत्तेत पुनरागमन करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. सध्या जागावाटपावरून असलेले मतभेद मिटवून जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात महाविकास आघाडीमधील घटक पक्ष गुंतले आहेत. मात्र जागावाटपापेक्षा मुख्यमंत्रिपद हा महाविकास आघाडीमध्ये कळीचा मुद्दा ठरण्याची शक्य आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीतील तिन्ही पक्ष इच्छूक असल्याने मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला सांगितला आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, अशी परंपरा राहिली आहे. २०१९ मध्ये शिवसेनेलाही त्यामुळेच मुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं, असे सांगितले.
मुंबईत सुरू असलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ३२ जागांवर विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला होता. तसेच आम्ही ३१ जागांवर जिंकलो. आता आम्ही विधानसभा निवडणुकीमध्येही विजय मिळवू. यावेळीही काँग्रेस पक्षाकडून अतिआत्मविश्वासामधून होणाऱ्या चुकांची पुनरावृत्ती होत आहे का, असा प्रश्न विचारला असता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष आपल्या आधीच्या चुकांमधून शिकून पुढे वाटचाल करत आहे. तसेच इंडिया आघाडीच्या स्थापनेमधून हेच दिसून येत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या तिढ्याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जो पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरतो, त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनतो, अशी महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनाही याच फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष होता. आता मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसचं नेतृत्व आणि राहुल गांधी यांना निर्णय घ्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीमधील मतभेदांबाबत अधिक भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही किमान समान जाहीरनामा आणि निवडणुकीसाठी समान रणनीतीसह निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि निवडणूक जिंकू. तर जागावाटपाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता. महाविकास आघाडीमध्ये आधी आम्ही कनिष्ठ सहकारी म्हणून आलो होतो. मात्र आता समिकरणं बदलली आहेत, याची जाणीवही त्यांनी करून दिली.