अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 11:56 AM2024-11-08T11:56:10+5:302024-11-08T11:57:45+5:30
अलीकडच्या काळात अजित पवार गटातील नेत्यांनी निकालानंतर काहीही घडू शकते अशी विधाने केल्यानं चर्चा झाली होती, त्यात नवाब मलिकांना भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचाराला हजेरी लावली त्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का असं चित्र समोर आले आहे.
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत अजित पवारांचे सूर बदलले दिसून येत आहेत. मोदी-योगी निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. मात्र बारामतीत मला कुणाची सभा नको असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे. त्याशिवाय योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही असं थेट उत्तर अजित पवारांनी दिले आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बारामतीत मोदी सभा घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, बारामतीत मला कुणाची सभा नको. त्यापेक्षा इतर भागात जाऊन सभा घेणे आवश्यक आहे. तिथे वरिष्ठांच्या सभा घेतल्या जातील असं उत्तर त्यांनी दिले. त्याशिवाय महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे. तुम्ही इतर राज्यांची तुलना महाराष्ट्राशी करू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात, त्यांचा विचार करून बोलून जातात. परंतु महाराष्ट्रातील लोकांनी हे कदापि मान्य केले नाही हा आजवरचा महाराष्ट्रातील निवडणुकांचा इतिहास आहे असं भाष्य अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर केले.
नवाब मलिकांना भाजपाचा विरोध तरीही...
नवाब मलिकांना उमेदवारी देण्यावरून भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांना अधिकृत उमेदवारी दिली. यावरूनही अजित पवारांनी मलिकांची पाठराखण केली आहे. नवाब मलिकांना आम्ही उमेदवारी दिली, घड्याळाचे चिन्ह दिले आहे. त्यांच्या प्रचाराला मी जाणारच..नवाब मलिकांवर आरोप झालेत, आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही त्यांना दोषी कसं ठरवता असा सवालही अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि शिंदेसेनेला विचारला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर समीकरण बदलणार?
दरम्यान, निकालनंतर पुढचं काही सांगणे आता कठीण आहे. एका बाजूला आघाडी, दुसऱ्या बाजूला युती आहे. दोन्हीकडे ३-३ पक्ष आहेत. उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात. निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी गणित जुळवावे लागेलच. काही ना काही करावे लागेल. ६ पक्ष आहेत. केवळ २-३ पक्ष नाहीत. त्यामुळे ६ पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी एका मुलाखतीत केले आहे.