लोकसभा निवडणुकीवेळी नणंद विरुद्ध भावजय लढतीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीमध्ये आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामधून काका अजित पवार आणि पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्यावर अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवरून शरद पवार गटाला टोला लगावला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्यावर अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘’लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देऊन मी जी चूक केली, तीच चूक त्यांनी पुन्हा करता कामा नये होती. मात्र त्यांनी माझ्याविरोधात उमेदवार देऊन केली आहे. आता मतदारच याबाबतचा काय तो निर्णय करतील’’.
अजित पवार यांनी केलेल्या या टीकेला त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या युगेंद्र पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘’समोरील उमेदवार माझे काका आहेत, असं मी पाहत नाही आहे. मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे. मला केवळ त्यांच्यासोबत राहायचं आहे आणि बारामतीकरांसाठी काहीतरी करायचं आहे, एवढाच विचार मी करत आहे’’, असे युगेंद्र पवार म्हणाले.