बारामती - मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जरांगे पाटलांचा मोठा हातभार राहणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर मी जरांगेंशी बोललो, माझे भाग्य त्यांनी आपलं ऐकलं आणि निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी केला आहे.
बारामती येथील सभेत असिम सरोदे म्हणाले की, शरद पवार माझ्या ऑफिसला आले होते, मी जरांगेबाबत त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मी उद्धव ठाकरेंनाही सांगितले तेही म्हणाले तुम्ही बोलून घ्या. आम्हाला वाटलं आम्ही लोकसभेला इतक्या सभा घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीला हे काय सुरू झालं. जर मराठा समाजाच्या नावाखाली इतके लोक उभे राहत असतील तर मतांच्या विभाजनाचा फायदा कोणाला होईल म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो. त्यांच्याकडे खूप गर्दी होती. ते म्हणाले आपल्याला निवांत बोलायचं असेल तर या सर्वांना भेटून मी घालवतो, मग आपण बोलू. रात्री ११.३० वाजता आमची बैठक सुरू झाली. ३ वाजेपर्यंत विविध विषयांवर आमची चर्चा झाली असं त्यांनी सांगितले.
'त्या' बैठकीत काय घडलं?
जरांगेसोबतच्या बैठकीत मी त्यांना म्हटलं, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी तुम्ही लावून धरली ती अत्यंत महत्त्वाची सामाजिक काम आहे. तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून हीच भूमिका कायम ठेवा, जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत असं कुणाकुणाला वाटत होते, तर यादी काढा. सगळ्यात पहिले देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती. दुसरे होते महाजन, तिसरे होते लक्ष्मण हाके अशा काही लोकांची यादी काढली तर त्यांना फायदा द्यायचा आहे म्हणून तुम्ही निवडणुकीला उभं राहिले पाहिजे असं वाटत होते. तुम्ही समाजात फूट पाडू नका याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. माझं भाग्य त्यांनी ते ऐकले आणि आपण निवडणुकीत उभे राहणार नाही असा निर्णय घेतला असा दावा असिम सरोदे यांनी केला.
दरम्यान, मला देवेंद्र फडणवीसांचा खूप राग आहे, कारण त्यांनी मराठा मोर्चावर पोलिसांच्या मदतीने यांनी महिलांवर लाठीचार्ज केला असं जरांगेंनी मला सांगितले. फडणवीस आणि भाजपाला मी पाठिंबा देणार नाही असं जरांगे म्हणाले. लोक आपल्या अनुभवातून शिकतात. ओबीसी समाजालाही फडणवीसांबद्दल राग आहे कारण १७ जाती कुठल्याही डेटाविना त्यांनी ओबीसी प्रवर्गात घेतल्या. या सगळ्या रागाचे एकत्रीकरण आपल्याला करता आले पाहिजे असं असिम सरोदे यांनी जनतेला म्हटलं.
राक्षसी प्रवृत्तीचा पराजय करायचाय
सदाभाऊ खोत यांनी ज्याप्रकारे शरद पवारांवर विधान केले त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला राग आहे. एक माणूस खंबीरपणे आजारातून उठून लोकशाही, संविधानासाठी उभा राहतो. तुम्ही त्यांच्यावर टीका करता हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही. त्या सभेला गोपीचंद पडळकर, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, फडणवीस हसत होते. हे हसणं राक्षसी कृत्य आहे. असं राजकारण आपल्याला अपेक्षित नव्हते. ही निवडणूक केवळ बारामतीची नाही, पुणे- मुंबईची नाही, महाराष्ट्राची निवडणूक आहे जिथे सभ्यतेची असभ्यतेशी लढाई आहे. या लढाईत आपण सर्वांनी उभं राहिले पाहिजे. आपल्याला राक्षसी प्रवृत्तीचा पराजय करायचा आहे. देव देव करणारे नरेंद्र मोदी आणि माणसांमध्येच देव बघणारे शरद पवार हा फरक आपल्याला समजला पाहिजे. प्रत्येकाचा देव आहे, प्रत्येकाचा धर्म आहे. कुणी हात जोडून पूजा करतो, कुणी हात उभे करून पूजा करतो. त्या प्रत्येक माणसाची संविधानात किंमत समान ठेवली आहे. देवाधर्माच्या नावाने आग लावून जे राजकारण इथं पेटवलं जातंय ते विझवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जातीधर्मावर आधारित विषारी राजकारण सुरू केले. मानसिक त्रास देणारं शापित राजकारण महाराष्ट्रात आणलं गेले, त्यांना धडा शिकवायचा आहे असं असिम सरोदेंनी भाजपावर टीका केली.
जातीधर्माच्या नावाने मते मागतायेत
लोकशाहीची प्रतिमा संविधानातून निर्माण झाली आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार, एखादी गोष्ट मान्य नसेल तर त्याविरोधात आंदोलन करण्याचा आपल्याला अधिकार आहे. मी वकील म्हणून काम करतो. बदलापूरची घटना झाली, २ लहान मुलींवर अत्याचाराचे प्रसंग पुढे आले. त्या प्रकरणात अनेक गोष्टी घडल्या आहेत असं लक्षात आले. काही लोकांना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचं एन्काऊंटर करण्यात आलं. त्याचे सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला. कायद्याचा वापर बदला घेण्यासाठी केला जातो. ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणा संविधानाच्या दृष्टीने तयार झाल्यात त्यांचा वापर बदला घेण्यासाठी केला जातो त्याला भारतातील लोकांचा विरोध आहे. कुठलेही भरीव काम समाजासाठी भाजपाने केले नाही त्यामुळे धर्माच्या नावावर मते मागितली जाते. छत्रपती शिवाजी महाराज न समजणाऱ्या माणसांनी पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. हा पुतळा कोसळला. हिंदू मुस्लीम इथं एक आहेत. 'तू ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा' तुम्ही माणूस बघून दाखवा. जन्माने तुम्ही हिंदू बनू शकता, मुस्लिम बनू शकता, कोण दाढी वाढवते, कोण वाढवत नाही, कोणी टोपी घालेल कुणी नाही, तुम्ही आतमधला माणूस शोधा. माणसाला माणूस भेटत नाही. आपल्याला माणूस भेटता आले पाहिजे. जे जे माणसांमध्ये दरी निर्माण करत असतील अशा राजकारणावर फुली मारली पाहिजे असं आवाहन सरोदेंनी केले.