पालघर - तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय हे कारण देऊन मला मागेही थांबवले, मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रत्येक वेळी गावितांना तिकिट दिले. जेव्हा जेव्हा चांगली संधी येते, मी चांगले काम केले तरीही मला डावलण्यात आलं असं सांगत आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले आहेत. वनगा यांचे तिकीट कापून पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदेसोबत त्यांच्या बंडात सहभागी झाले होते.
उमेदवारी नाकारल्याने श्रीनिवास वनगा म्हणाले की, माझ्या वडिलांपासून केलेले काम, मी केलेल्या प्रामाणिकपणाचं हे फळ आम्हाला मिळते. प्रत्येक संधी वेळी मला डावलण्यात आले. खासदारकीच्या पोटनिवडणुकीतही मला डावलण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं. तर एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होते, कुठल्याही आमदाराला घरी बसवणार नाही. प्रत्येकाला निवडून आणू. परंतु तो शब्द पाळला नाही. कालपासून श्रीनिवास वनगा यांनी जेवण सोडले आहे. कुणाशीही बोलत नाही. आत्महत्या करणार असेच बोलतायेत. उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव होते, मी चुकीचं वागलो. एकनाथ शिंदेंवर मी विश्वास ठेवला, पण त्यांचा घात झाला. माझ्या नवऱ्याचं काय चुकलं असा सवाल श्रीनिवास यांच्या पत्नीने विचारला आहे. तसेच माझ्या पोराने अन्नपाणी सोडलं, त्याच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर आम्ही काय करायचं..? असं श्रीनिवास वगना यांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
पालघरमध्ये काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली, यात एक नाव माजी खासदार राजेंद्र गावित यांचं होतं. २०१९ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या राजेंद्र गावितांना यावेळी उमेदवारीच मिळाली नाही. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपामध्ये गेलेल्या राजेंद्र गावितांनी सहा महिन्यातच परत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये श्रीनिवास वनगा यांना ६८,०४० मते मिळाली होती. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या योगेश नाम यांना २७,७३५ मते मिळाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेश गोवारी यांना १२,८१९ मते मिळाली होती, तर वंचित बहुजन आघाडीचे विराज गडग यांना ११,४६९ मते मिळाली होती. महत्त्वाचं म्हणजे नोटा लाही ७,१३५ मते पडली होती. वनगा यांनी ४०,३०५ मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होते.