मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने महेश सावंत तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिल्याने येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार तसेच येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे आपली उमेदवारी मागे घेणार, अशी चर्चा रंगली आहे. मात्र शिंदे गटाचे उमेदवार असलेले सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याच ठामपणे सांगितलं आहे. मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विधानसभा निवडणुकीत विजयी होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.
माहिममधील विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाशी बोलताना सदा सरवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, माहिममधील लढतीबाबत शिवसेनेमध्ये चर्चा नाही, तर विरोधी मंडळींमध्ये चर्चा सुरू आहे. मी उद्या १० वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. तसेच शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणं, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दादर माहिममधील जनतेला, मतदारांना न्याय देणं ही आजची काळाची गरज आहे. ३६५ दिवस आम्ही या मतदारसंघामध्ये काम करतो. सर्वसामान्यांमधील उमेदवार म्हणूल लोक माझ्याकडे बघतात. त्यामुळे इतर कुठल्याही चर्चेकडे दुर्लक्ष करा. मी उद्या सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत सदा सरवणकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला वेळ देण्याचं काही कारणच नाही आहे. त्यांनी आशीर्वाद दिले. एबी फॉर्म दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून दिवसातून एकदा वर्षावर जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे सरवणकर यांनी सांगितले. दरम्यान, अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत दीपक केसरकर आणि आशिष शेलार यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. आतापर्यंत तसा कुठलाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही. निदान माझ्यापर्यंत तरी आलेला नाही, असेही सदा सरवणकर यांनी यावेळी सांगितले.