माहिम विधनसभा मतदारसंघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरून सध्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिमच्या जागेवरून मोठं विधान केलं आहे. ''माहिमची जागा भाजपाकडे असती तर आम्ही एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला निर्णय घ्यायचा आहे'', असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आपले विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर येथून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका भाजपातील काही नेत्यांनी घेतलेली आहे. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह भाजपामध्ये दिसून येत आहे. मात्र येथील शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केल्यानंतरही सरवणकर हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, माहिमच्या जागेबाबतचा निर्णय हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे. कारण ती जागा त्यांच्या कोट्यामध्ये गेली आहे. ती जागा भाजपाकडे असती तर आम्ही एका मिनिटामध्ये निर्णय घेतला असता. पण ती जागा त्यांच्या पक्षाकडे असल्याने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे.