छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राच्या राजकारणात इम्तियाज जलील यांच्यासह अकबरुद्दीनही खांद्याला खांदा लावून उभा राहणार. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर असो वा मुंबई हा अकबरुद्दीन ओवैसी कायम इथं येत राहणार. जीवनात मी कधीही मत मागितले नाही पण यंदाच्या निवडणुकीत तुम्ही तुमचं मत माझ्या सहकाऱ्यांना द्या. तुमच्या प्रत्येक समस्येत मी तुमच्यासोबत राहणार. जर आपले १० आमदार निवडून आले तर ना ठाकरे ना शिंदे, ना गांधी, ना पवार आमच्याशिवाय कुणी सत्ता बनवू शकत नाही. ही सुवर्णसंधी आहे असं सांगत एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी महायुतीसहमहाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजीनगर याठिकाणी अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, १० वर्षांनी मी पुन्हा महाराष्ट्रात आलोय. जेव्हा मी १० वर्षाआधी महाराष्ट्रात आलो तेव्हा इम्तियाज जलील नव्हते, वारिस पठाण नव्हते, आमचे मालेगाव, धुळे इथले आमदार नव्हते. जेव्हा हे लोक निवडून आले त्यांनी जबाबदारीने एमआयएमचं नेतृत्व पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आज १० वर्षांनी मी आलोय ते या लोकांच्या पाठीमागे मजबुतीने उभा राहून MIM चा झेंडा सांभाळण्यासाठी आलोय. अकबरुद्दीन ओवैसी कधी कुठल्याही लालसेची गरज नाही. नेतृत्व येईल आणि जाईल, जमात महत्त्वाचा आहे. आज परीक्षेची वेळ आहे. जवळपास ४ हजार उमेदवार त्यांचे नशीब आजमवत आहेत. १० वर्षापूर्वी भाजपा - शिवसेना होती आणि राष्ट्रवादी- काँग्रेस, , समाजवादी पक्ष होता मात्र आज काँग्रेस आहे, २ राष्ट्रवादी आहेत, २ शिवसेना आहेत, शिंदे सेना, ठाकरेसेना...हिंदुत्व बोलणारी शिवसेना-भाजपा पक्ष, आता हिंदुत्व विचारधारेच्या शिवसेनेचे २ तुकडे झाले. आता काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जवळ केले. तीन पक्षांची आघाडी बनली. उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा धडा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना शिकवण्यात यशस्वी झाले की नाही...राहुल गांधी प्रियंका गांधी हे पुरोगामित्वाचे धडे उद्धव ठाकरेंना देण्यात यशस्वी झाले की नाही? हा माझा प्रश्न आहे असा त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना समजून घेतले की भाजपाने दोघांना समजून घेतले..? कुठे आहे विचारधारा...यांच्याकडे विचारधारा नाही, धोरण नाही फक्त सत्तेची खुर्ची हवीय. आमचं काम लोकांची मने जिंकणे आहे. सत्तेवर बसून मज्जा लुटणारे आम्ही नाही. आम्ही खऱ्या अर्थाने समाजाचा आवाज संसद असो वा विधानसभा तिथे उचलून धरतो. अकबरुद्दीन ओवैसी मी मुसलमान आहे, मला मुस्लीम असल्याचा गर्व आहे आणि हिंदुस्तानी असल्याचा अभिमान आहे. आम्ही मुस्लिमांचा आवाज बनून मुस्लिमांची समस्या जाणतो. मुस्लिमांच्या हक्कासाठी लढतो. अन्यायाविरोधात उभे राहतो. पण मागासवर्गीयांना ताकद देणे, जो मागे आहे त्याला पुढे आणणं हे नेतृत्वाचं काम आहे. मागासवर्गीयांना ताकद देणे हा आमचा विचार आहे. आम्ही भडकाऊ भाषण करत नाही. आम्ही हक्काचं बोलतो, आमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात म्हणून त्याला भडकाऊ बोललं जातं असा टोलाही अकबरुद्दीन ओवैसींनी विरोधकांना लगावला.