विधासभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांकडून बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार अर्जुन खोतकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र अर्जुन खोतकर आणि स्थानिक भाजपा नेत्यांचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिलेले असल्याने येथे भाजपाकडून खोतकरांना सहकार्य होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजपाला सूचक इशारा दिला आहे. आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही, असं खोतकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी पुढील रणनीतीबाबत बातचित करताना अर्जुन खोतकर म्हणाले की, आता गाफील राहून जमणार नाही. सर्वांनी यावं आणि तिथे प्रचार प्रसार करावा. आता आपली उमेदवारी ही शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची आहे. आपल्याला कुठेही वातावरण खराब करायचं नाही. पण एक गोष्ट आहे. त्यांनी जालन्यात काम नाही केलं, तर आपणही त्यांच्या भागात काम करायचं नाही. त्यांनी जोमात काम नाही केलं, तर आपणही जोमात काम करायचं नाही.
ते पुढे म्हणाले की, आपल्याला वातावरण खराब करायचं नाही. आपण युतीच्या बाजूचेच आहोत. वरिष्ठ पातळीवरून आपल्याला तसे आदेश आहेत. मात्र पण त्यांनी ऐकलंच नाही तर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी शांततेने घ्या, असे अर्जुन खोतकर म्हणाले.
अर्जुन खोतकर हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकर आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे येथे महायुतीमध्ये कसा समन्वय राहतो, यावर पुढील निकाल अवलंबून असतील.