मुंबई - मराठा आरक्षण पहिल्यांदा मिळाले ते देवेंद्र फडणवीस सरकार असताना. त्या सरकारने ते उच्च न्यायालयातही टिकविले. सारथीसारखी मराठा समाजाच्या कल्याणासाठीची संस्थाही त्यांनीच स्थापन केली. त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी महायुती सरकारच्या काळातही कायम राहिली. फडणवीस यांनी टिकवलेले मराठा आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात गेले. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी महायुती सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे, तरीही फडणवीस यांना मराठा आरक्षणावरून टार्गेट करण्याचे राजकारण महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आणि मराठा समाजासाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने झालेल्या कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी मांडला.