विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. या आकड्यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला १४८ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला ८५ आणि अजित पवार गटाला ५१ जागा आल्या आहेत. उर्वरित ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
महायुतीमध्ये भाजपाने पहिल्या यादीत ९९, दुसऱ्या यादीत २२, तिसऱ्या यादीत २५ आणि शेवटच्या यादीत २ अशी एकूण १४८ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २०, तिसऱ्या यादीत १३ आणि शेवटच्या चौथ्या यादीत ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पहिल्या यादीत ३८, दुसऱ्या यादीत ७, तिसऱ्या यादीत ४ आणि शेवटच्या यादीत २ उमेदवारांची घोषणा केली आहे. याशिवाय महायुतीने आपल्या मित्र पक्षांना ४ जागा दिल्या आहेत. अशा प्रकारे महायुतीचं जागावाटप उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्ण झालं आहे.
भाजपाने २०१९ मध्ये १६४ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या मात्र यावेळी भाजपाने मित्रपक्षांसाठी तडजोडी करत १६ जागा सोडल्या आहेत. शिंदे गटाला ८५ जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार गटाला ५१ जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीमधील घटक पक्षांचं जागावाटप जवळपास नीट झालं आहे. काही ठिकाणी आमच्या मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत. परंतु एकंदरीत पाहिल्यास आम्ही चांगल्याप्रकारे जागावाटप करण्यात यशस्वी झालो आहोत, असं मला वाटतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.