महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भामधील प्रचारामध्ये सोयाबीनचे कोसळलेले भाव हा कळीचा मुद्दा ठरला. तसेच सोयाबीनच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदर्भातील प्रचारसभांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात साधारणत: ३ हजार ७५१ रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात आहे. हा भाव हमीभावापेक्षा जवळपास १ हजार १४१ रुपयांनी हे दर कमी आहेत. केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवित आहेत. काँग्रेसने आधी कर्नाटकात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव मिळवून द्यावा, असे आव्हान भाजपा नेते अनिल बोंडे यांनी काँग्रेसला दिले आहे.
जगात वर्षाला ३५ कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. यातील भारताचा वाटा साधारणत: एक कोटी टनपर्यंत आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ लाख हेक्टरवर तर महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. मध्य प्रदेशात ५०.६० लाख टन तर महाराष्ट्रात ४०-४५ लाख टन उत्पादन अपेक्षित असते. मागील काही वर्षांत सोयाबीनने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वाधिक क्षेत्र व्यापले असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. हे व्यापक क्षेत्र लक्षात घेऊन काँग्रेसने महायुतीवर टीका करण्यासाठी सोयाबीनचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी ठेवला आहे. महायुती सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनीही सोयाबीनचा मुद्दा लावून धरला आहे. महायुतीने जाहीर केलेल्या सहा हजार रुपये प्रति क्विंटलची घोषणा पुढे नेत सात हजार रुपये केली आहे.
दरम्यान, सोयाबीनच्या भावावरून काँग्रेसवर टीका करताना अनिल बोंडे म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अमरावती जिल्ह्यातील तिवसाला आले. सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचे दर देऊ म्हणाले. एक शेतकरी या नात्याने देशातील सोयाबीनचे भाव पाहिले. संपूर्ण कर्नाटकात ३,८०० रुपयांपेक्षा सोयाबीनला भाव नाही. खर्गे यांच्या गुलबर्ग्याच्या बाजारात हे भाव दिले जात आहेत. तरीही कर्नाटक सरकार दखल घेत नाही, सोयाबीनची खरेदी करीत नाही. ‘भावांतर’ योजनाही राबवित नाही. खर्गे मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन खोटे बोलतात. लोकांची फसवणूक करतात. आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी भावाची चिंता करीत नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी सोयाबीन उत्पादकांना मदत दिली होती. आता भावांतर योजना लागू करून हमीभावापेक्षा कमी दरातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहेत. असे काही तरी कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना खर्गे यांनी सांगावे, असा टोलाही डॉ. बोंडे यांनी लगावला आहे.