कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 09:09 PM2024-10-31T21:09:59+5:302024-10-31T21:11:22+5:30

मला जनतेचा सेवक व्हायचं आहे. वारं फिरलंय ते मनसेच्या बाजूने फिरलंय असा विश्वास मनसे उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला. 

Maharashtra Assembly Election 2024 - In Kasba Peth Constituency, Hindu Mahasangh has given support to MNS candidate Ganesh Bhokare | कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?

कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?

पुणे - राज ठाकरेंविषयी आम्हाला प्रचंड आदर, या निवडणुकीमुळे त्यांना पाठिंबा देण्याची संधी आम्हाला मिळतेय. कथाकथित हिंदुत्ववादी पक्ष हिंदुचे कसं नुकसान करत आहेत त्याबाबत आम्ही १०० पापं असं पुस्तक छापणार आहोत. हिंदुंना गृहित धरू नका आणि हिंदूचे नुकसान करू नका असा संदेश कसब्यातून महाराष्ट्राला जाईल. यावेळी कसब्यात वेगळा निकाल लागेल असं सांगत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मनसेचेकसबा पेठेतील उमेदवार गणेश भोकरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

आनंद दवे यांनी म्हटलं की, मंडल आयोग कुणी आणले, मंडल आयोगाचे समर्थन का केले, काश्मीरात हिंदू पंडितांची हत्या झाली तेव्हा तुम्ही सरकारचा पाठिंबा का काढला नाही आमच्याकडे १०० प्रश्न आहेत. आम्ही जाहीर सभेत हे प्रश्न विचारू. गणेश भोकरेसारखा सुशिक्षित तरूण उमेदवार मिळाला असेल तर कसब्याचाही गौरव होईल असं वाटतं. आम्ही हिंदू महासंघ म्हणून गणेश भोकरे आणि मनसे यांच्यासोबत कसबा पेठेत नक्कीच मदतीला आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच निवडणुकीनंतर पक्षाच्या नेत्यांनी काय भूमिका घेतील हा त्यांचा विषय आहे. आमच्या हातात पुण्यातील ८ मतदारसंघातून चांगले उमेदवार निवडून जाणे. हिंदू म्हणून सांगणारे नव्हे तर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे रक्षण करणारे उमेदवार निवडून जावेत. हिंदूंना घाबरवून ठेवणाऱ्या पक्षांची पुन्हा राज्यात सत्ता येऊ नये अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं.

दरम्यान, कसब्यात भाजपाने जे उमेदवार दिलेत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. मला सातत्याने गोरक्षण संघटना, लिंगायत समाज, ब्राह्मण संघटना पाठिंबा देत आहे. मी सातत्याने करत असलेल्या या कामाचा गौरव आहे. आज हिंदू महासंघाने मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी ऋणी आहे. येणाऱ्या निवडणुकीत कसबा पेठेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा फडकेल. मला आमदार नाही तर इमानदार व्हायचं आहे. ज्यांना भाजपाने उमेदवारी दिली ते ४ टर्म महापालिकेत होते, परंतु त्यांच्याकडे एकही काम दाखवण्याचे नाही. काँग्रेस आमदाराचीही हीच अवस्था आहे. मला जनतेचा सेवक व्हायचं आहे. वारं फिरलंय ते मनसेच्या बाजूने फिरलंय असा विश्वास मनसे उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला. 

कसबा मतदारसंघाची परिस्थिती काय?

२०१९ च्या निवडणुकीत कसबा पेठेत भाजपाच्या मुक्ता टिळक या आमदार झाल्या तर इथं दुसऱ्या नंबरवर काँग्रेसचे अरविंद शिंदे होते. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. तेव्हा तिथे हेमंत रासने यांना भाजपाने उमेदवारी दिली. परंतु काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचा सुरक्षित गड उद्ध्वस्त करत आमदारकी मिळवली. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा हेमंत रासने आणि काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यात मनसेनेही गणेश भोकरे या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उतरवलं आहे. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी झाली आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - In Kasba Peth Constituency, Hindu Mahasangh has given support to MNS candidate Ganesh Bhokare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.