मुंबईत काँग्रेसचे ११ पैकी फक्त २ उमेदवार मराठी; भाजपाचा घणाघात, ठाकरे गटावरही निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:10 PM2024-11-04T13:10:26+5:302024-11-04T14:00:58+5:30
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसनं ११ पैकी केवळ २ मराठी माणसांना उमेदवारी दिली आहे. इतका मराठीद्वेष काँग्रेसनं केला आहे. उद्धव ठाकरेंची यावर भूमिका काय..? मराठी चेहरे काँग्रेसमधून हद्दपार केले असा आरोप करत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेसचे जे मराठी चेहरे आहेत त्यांना उमेदवारीतून डावलण्यात आले. बाजूला सारले गेले. मग त्यात भाई जगताप, मधुकर अण्णा चव्हाण, सचिन सावंत जे मोजके राहिलेत त्या सगळ्यांना मराठी आहेत म्हणून कात्रजचा घाट दाखवला आहे. एवढा काँग्रेसचा मराठी द्वेष उद्धव ठाकरेंना मान्य आहे का..? काँग्रेसची महाराष्ट्रविरोधी भूमिका ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही काँग्रेसचे सर्वोच्च नेते छाती पिटवून महाराष्ट्र मराठी भाषिक राज्य आम्ही होऊ देणार नाही असं म्हणत होते. समस्त महाराष्ट्र पेटून उठला एकत्रित आला, आंदोलन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली तेव्हा आंदोलनकर्त्यांना घरात घुसून गोळ्या मारल्या आहेत. आमचे १०६ हुतात्मे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गेले. मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या याच काँग्रेसने घातल्या. मराठी भाषिक राज्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसनं तेव्हाही मराठी विरोधाची भूमिका घेतली होती आणि आता तीच भूमिका पुढे नेत ११ पैकी केवळ २ मराठी उमेदवार दिलेत. हा मराठीद्वेष त्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी म्हटलं.
तसेच स्थैर्य, शांतता प्रगती हवी असेल तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार करा. याकुब मेमनचं समर्थन हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील लोक करतात. जिथे जिथे त्यांचे राज्य येते तिथे अशा घटकांचे समर्थन महाविकास आघाडी करते. केवळ याकुब मेमनंच नाही, इब्राहिम मुसा जो मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी तो लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करत होता. हे सहज होत नाही. अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांशी यांचे लागेबांधे आहेत. कसाबच्या भूमिकेचं समर्थन, जे वीर पोलिसांनी बलिदान दिले त्यांना लागलेल्या गोळ्या या कसाबच्या नव्हत्या असं काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा म्हणतात. जम्मू काश्मीर ते महाराष्ट्र अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांसोबत मविआ नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे या प्रवृत्तीला हद्दपार करा असं आवाहन आशिष शेलार यांनी केले आहे.
दरम्यान, मुस्लीमांना आरक्षण देण्याची मागणी समाजवादी पक्ष करतोय, धर्माच्या आधारे आरक्षण संविधानात मान्य नाही. परंतु ही मागणी सपा करते, शरद पवार त्यांना पाठिंबा देतात, उबाठा त्यांना मांडीवर घेते. त्यामुळे तुष्टीकरणाच्या राजकारणाचे उद्धव ठाकरे महामेरू आहेत. मुस्लीम आरक्षणावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करायला हवं अशी मागणीही आशिष शेलारांनी केली.