मुंबई - सध्याच्या राजकारणात पक्षांतरं करणे हे काही नवीन राहिले नाही. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात तर परवा तिसऱ्याच पक्षात असणारे अनेक नेते राजकारणात सापडतील. आयाराम-गयाराम ही संस्कृती राजकारणात ५० वर्षापूर्वीच आली होती. आयाराम गयाराम या म्हणीची सुरुवातच १९६९ मध्ये हरियाणात झाली. जिथे आयाराम नावाचे एक आमदार होते, त्यांनी एका दिवसात २ राजकीय पक्ष बदलले होते. तेव्हापासून आयाराम गयाराम असं राजकारणात बोलू लागले.
लोकमत दिवाळी अंक 'दीपोत्सव' यात राजकीय विश्लेषक योगेद्र यादव लिहितात की, हरयाणाचेच आणखी एक उदाहरण घ्यायचे तर १९८० मध्ये मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या सर्व आमदारांना घेऊन एका रात्रीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता आणि सरकार बदलले होते. तेव्हा आज दिसतात त्या घटना काही अपवाद नाहीत. देशभरात असे अनेक किस्से सांगता येतील. मुद्दा हाच की ज्या घटनांमुळे आपल्याला आज वाटते की राजकारणाने अत्यंत हीन पातळी गाठली आहे तशा घटना देशाच्या इतिहासात आजवर अनेकदा घडल्या आहेत, जुन्याच आहेत असं त्यांनी म्हटलं.
२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरीच राजकीय उलथापालथ राजकारणात घडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यानंतर अडीच वर्षात ठाकरे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात महायुतीचं सरकार आणलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर वर्षभरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली.
अजित पवार यांच्यासह दिग्गज राष्ट्रवादी नेत्यांनी ४० आमदारांसह वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षाचे २ गट तयार झाले. आजच्या घडीला राज्यात ६ प्रमुख पक्ष असून त्यात भाजपा-काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत तर शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे गटही रिंगणात आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश घेत आहेत. मात्र राजकारणातील ही आयाराम गयाराम राजकीय संस्कृती फार जुनी आहे.