मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदा ६५.१ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. यावेळी पहिल्यांदाच ६ प्रमुख राजकीय पक्षांसोबत इतर छोटेमोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सर्व पक्षांनी मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत आणलं. २०२४ च्या निवडणुकीत बंपर व्होटिग झाल्यामुळे जवळपास १०० विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील मतदारांनी भरघोस मतदान केले होते. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. १९९५ साली राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार शिवसेना-भाजपा युतीचं आलं होते. तज्ज्ञानुसार, महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमकपणे प्रचार केला. भाजपाकडून बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमुळे निवडणकीतील वातावरण तापवण्यात आलं. मुस्लीम संघटनांकडून महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या मोहिमेमुळे या घोषणा पुढे आल्या. त्याशिवाय महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षफुटीमुळे भावनिक वातावरण करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत, मागील निवडणुकीच्या तुलनेने २०२४ मध्ये मतदारांच्या संख्येत वाढ झाली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी ८.८५ कोटी मतदार होते त्यात यंदा वाढ होऊन ९.६९ टक्के मतदार झाले. निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा सत्ता बदलते पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. याठिकणी काही वेळा मतदान वाढले तर सत्ता बदलली तर काही वेळा सत्ताधाऱ्यांना फायदा झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला. लोकसभेला ६१.३९ टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते तर महायुतीला ४२.१७ टक्के मते मिळाली होती.
दरम्यान, २००४ मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाल्याचा फायदा झाला. २००४ मध्ये ६३.४४ टक्के मतदान झाले होते. तेव्हा राष्ट्रवादीला ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या आणि पुन्हा आघाडीचं सरकार आलं. त्याकाळी शिवसेनेला ६१ तर भाजपाला ५४ जागा मिळाल्या. २०१४ च्या निवडणुकीतही मतदानात चार टक्क्यांनी वाढ झाली होती आणि महाराष्ट्रात सरकार बदलले होते. २०१४ मध्ये ६३.३८ टक्के मतदानानंतर भाजपा १२५ जागा जिंकत एक नंबरचा पक्ष बनला. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली, पण ६३ जागा जिंकता आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले.
कमी मतदानानंतरही सत्ता बदलली नाही
महाराष्ट्राच्या गेल्या ३० वर्षांच्या निवडणूक इतिहासात असे प्रसंग आले आहेत की कमी मतदान होऊनही सरकार बदलले नाही. २००९ मध्ये मतदानाची टक्केवारी कमी होऊनही राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत आली. २००९ मध्ये ५९.६८ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी घसरल्याचा फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसला झाला. काँग्रेसने ८२ तर राष्ट्रवादीने ६२ जागा जिंकून सत्ता टिकवली. विरोधात बसलेल्या शिवसेना आणि भाजपाला एकूण ११० जागा मिळाल्या. त्यावेळी मनसेने १३ जागा जिंकून महायुतीला धक्का दिला होता. २०१९ मध्ये देखील ६१.४४ टक्के मतदान झाले, जे मागील निवडणुकीच्या तुलनेत २ टक्के कमी होते परंतु सरकार बदलले नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.