पुणे - धनगर गेले अन् मेंढरे राहिली असं विधान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी करून धनगर समाजाचा अपमान केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अपमान आहे. ज्यादिवशी धनगरांच्या काठीचा फटका त्याला पडेल तेव्हा तो जागेवर येईल अशी टीका मावळमधील सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी केली आहे. मावळ मतदारसंघात सध्या महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र या मतदारसंघात शेळकेंविरोधात भाजपाचे नेते बाळा भेगडे यांच्यासह महाविकास आघाडी, मनसे यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळमध्ये सुनील शेळकेविरुद्ध बापू भेगडे अशी थेट लढत आहे.
बापू भेगडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सुनील शेळकेंनी असं विधान करून दाखवून दिले की ते जातीभेद करतात. हे आपल्या महाराष्ट्रासाठी अपमानास्पद आहे. समाजकारण करणारे लोक एकतेचा विचार पुढे करतात. त्या तुम्ही काही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांना मेंढरे म्हणाला. हे कार्यकर्ते माझा परिवार आहे. मतप्रवाह वेगळे असले तरी आपण काय बोलतोय याचे भान सुनील शेळकेंना नाही. स्वार्थासाठी काहीही विचार करतो. कायदेशीर सल्ला घेऊन मी सुनील शेळकेंविरोधात तक्रार दाखल करेन. अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असंही त्यांनी सांगितले.
मावळात यंदा दुरंगी लढत
मावळ मतदारसंघात १८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत त्यातील ६ अर्ज बाद झाले, त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी माघार घेतली. सध्या मावळमध्ये ६ उमेदवार रिंगणात आहे. परंतु या मतदारसंघात बापू भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात थेट लढत होत आहे. सुनील शेळकेंना तिकीट मिळाल्यानंतर बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.
विशेष म्हणजे बापू भेगडे यांच्या उमेदवारीला सर्वपक्षीयांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघातील नाराज भाजपा नेते बाळा भेगडे यांनी बापू भेगडेंचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केले. त्याशिवाय महाविकास आघाडीनेही या मतदारसंघात बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. नुकतेच बाळा भेगडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर मनसेनेही या मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापू भेगडेविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके अशी लढत पाहायला मिळत आहे.