कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:23 PM2024-11-05T19:23:17+5:302024-11-05T19:27:57+5:30
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला. परंतु हा प्रकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही अनपेक्षित होता. आमच्या विचारात आणि डोक्यातही नव्हतं. मला माघार घेण्यासाठी निरोप आला होता. मी तिथे पोहचायच्या आधीच काँग्रेस उमेदवाराने माघार घेतली असं विधान अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी केले आहे.
राजेश लाटकर म्हणाले की, मी माझा उमेदवारी अर्ज अपक्ष भरला होता. माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून जाहीर झाली होती. परस्पर उमेदवारी रद्द का केली हे मला कळालं नाही. चुकीच्या पत्राचा संदर्भ देत मला विरोध असल्याचं दाखवून माझी कोणतीही भूमिका जाणून न घेता उमेदवारी रद्द झाली. त्यामुळे माझा मानसन्मान, कुटुंबाची प्रतिमा मलिन झाली. कार्यकर्तेही नाराज झाले म्हणून अपक्ष लढाई लढायची हे आम्ही ठरवलं. ज्या पक्षासाठी इतक्यांदा विधानसभा असो, लोकसभा असो प्रत्येक वेळी झोकून काम करत उच्चांकी मतदान देण्याचं काम केले होते. आमची नाराजी खोलवर होती. माझे कार्यकर्ते आणि संपूर्ण कुटुंब २-३ दिवस तणावात होते. त्यामुळे अर्ज भरला. छाननी झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. माघारीच्या दिवशी अचानक अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याचे धक्का होता. पण त्यानंतर ताबडतोब मलादेखील माघारी घेण्याचा निरोप होता. मी २.४५ ला तिथे पोहचायच्या तयारीत होतो. परंतु २.३५ लाच मधुरिमाराजे यांनी माघारी घेतल्याची बातमी समोर आली. त्यामुळे मी माझा निर्णय तुर्तास थांबवला. आता महाविकास आघाडीचे पाठबळ मिळालं पाहिजे असं ठरवलं. वेगवेगळ्या नेत्यांचे मला फोन आले. विषय सांगण्यात आले. पण मी बंटी पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस, उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांच्या पक्षाचा असा इंडिया आघाडीचा पाठिंबा मिळावा अशी मिळावा अशी जाहीर भूमिका घेतली असं त्यांनी सांगितले.
तसेच खासदार शाहू छत्रपती, मालोजीराजे आणि मधुरिमाराजे माझ्या घरी आल्या होत्या. आपण माघार घ्यावी असं सांगितले, माझ्या उमेदवारी रद्द केली याचे काही नाही परंतु माझा एकच प्रश्न होता, उमेदवारी का बदलली याचा खुलासा आजतागायत झाला नाही. एक पत्र मीडियात आलं, त्यात बदनामीकारक मथळा होता, ते पत्र मला माहिती नाही असं महाराज म्हणाले. मला स्पष्टता व्हावी. छत्रपती घराण्याचा मला संपूर्ण आदर आहे. मला अशी वागणूक का मिळाली याचा खुलासा झाला नाही. या प्रकारामुळे माझा परिवार बदनामीला सामोरे गेला, सामाजिक कार्यकर्ते त्यांनाही धक्का बसला. मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलतो त्यानंतर तुम्हाला कळवतो असं महाराजांना सांगितले. तोपर्यंत मला तुमच्याकडून काही स्पष्टता मिळाली तर बरं होईल अशी चर्चा झाली असंही राजेश लाटकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला आहे. ही जागा काँग्रेसकडे होती त्यामुळे काँग्रेसला प्राधान्य दिले. मी पत्रही पाठवले आहे. सतेज पाटील यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी सांगितले कार्यकर्त्यांशी बोलून तुम्हाला कळवतो असं सांगितले आहे. काँग्रेससाठी जे अतोनात सतेज पाटील यांनी प्रयत्न केलेत. त्यामुळे अशा प्रकारामुळे ते भावूक झाले. आम्हालाही हळहळ झाली. सर्वच कार्यकर्त्यांनी बोध घेऊन वागणूक ठेवली आहे. मी सकारात्मक निर्णयाची वाट पाहतोय असं राजेश लाटकरांनी म्हटलं.