विधानसभा निवडणुसाठी इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, काँग्रेसकडून आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 08:05 PM2024-07-06T20:05:45+5:302024-07-06T20:09:07+5:30
Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत, असं आवाहान काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी केले आहे.
उमेदवारी अर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर मुंबई येथे व सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज पक्ष निधीसह टिळक भवन दादर, मुंबई येथे सादर करावा. सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये पक्षनिधी अर्जासोबत भरावा लागणार आहे. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करतील त्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाने १० ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत.
मतदार याद्या अद्ययावत करण्यावर भर द्या..
मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून २५ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पहावे. नसल्यास ती नावे पुन्हा यादीत सामाविष्ठ करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच नाव, पत्ता यात काही बदल करावयाचा असल्यास ती सर्व कामे करून मतदार यादीत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी. ज्या युवक, युवतींनी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेली आहेत, त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावरही भर द्यावा. अशी सूचना प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रातांध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे.