महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुती आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आले आहेत. आज झालेल्या महायुती सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता आम्हाला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे. आता विषय वेगळा आहे. कारण आता मराठा आरक्षण विषयावर बोलून उपयोग नाही. आता समाजाला कळतंय, समाजाला सगळं माहिती आहे. सरकारने टाकलेल्या खटल्यांमधून किती फायदा झाला आहे. एक-दीड लाख तरुणांचा फायदा झाला आहे. आमच्या मुलांच्या नॉन क्रिमिनल निघेनात, हा पण त्यांनी मोठा फायदा केला आहे. काही खटले खूप मोठे केलेत, हा पण एक फायदाच आहे का? आमच्या हजारो मुलांवर केस झाल्या त्यांना आता नोकरीत जाता येईना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मराठ्यांवर उपकार केले आहेत, अखा खोचक टोला जरांगे पाटील यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, आमच्यावर खटले दाखल केले हा आमचा फायदाच आहे का? आमच्यावर गोळ्या झाडल्या, हा आमचा फायदाच आहे का? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी लागू नाही झाली, हा फायदाच आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी आमची सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ दिली नाही, हा फायदा आहे का? सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्मेंटचं, हैदराबाद संस्थानचं गॅझेट फडणवीस यांनी लागू होऊ दिलं नाही, हा काय आमचा फायदा आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच जरांगे पाटील यांनी यावेळी महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणाले आणि आता १५ जाती ओबीसींच्या आरक्षणात घातल्या. आमच्या पोरांचं वाटोळं केलं, हा आमचा फायदा आहे का? आमच्या हजारो कुणबी नोंदी निघाल्यात, त्याची प्रमाणपत्रं आहेत. तिथले अधिकारी देत नाही आहेत, फडणवीस यांनी तेही रोखलंय, हा आमचा फायदा आहे का, अशी विचारणा जरांगे पाटील यांनी महायुती सरकारकडे केली.