पुणे - हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा होती. या सभेत उद्धव ठाकरे गटाचे वसंत मोरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटलांनी सभेत वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ असं एक विधान केले. या विधानानं पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार का अशी चर्चा पुणेकरांमध्ये सुरू झाली.
जयंत पाटलांच्या या विधानानं वसंत मोरे म्हणाले की, जयंत पाटलांच्या आधी माझं भाषण झाले, त्यात मी सांगितले, अवघ्या काही महिन्यात पुणे महापालिकेची निवडणूक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बसलो होतो. आत्ताच्या घडीला आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयार आहोत परंतु अशाप्रकारे हातात मशाल, तुतारी महापालिका निवडणुकीपर्यंत एकत्र राहिली पाहिजे याची खबरदारी आपण घ्या. हे मी बोलल्यानंतर जयंत पाटील यांनी हास्यास्पदरित्या तसं बोलले. आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयारी केलीय. उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या आदेशानंतर मी हडपसर, खडकवासला मतदारसंघात चांगले काम करतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी मी इथं आहे. पुणे महापालिका निवडणुकीत या प्रभागात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना ठाकरे या २ पक्षांचे प्राबल्य या भागात आहे. या भागात मीच शिवसेनेचं नेतृत्व करेन. हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. कात्रजमध्ये मी उमेदवार होते, त्यावेळी महादेव बाबर शिवसेनेचे आमदार झाले, कात्रजने मला चांगले मतदान दिले होते. २०१९ ला मी विधानसभा लढवली तेव्हा कात्रज भागातून २३-२४ हजार मतदान मला झाले. जर मला इतके मतदान पडले नसते तर चेतन तुपे आमदारही होऊ शकले नसते असं वसंत मोरे यांनी म्हटलं.
दरम्यान, आता जर वातावरण पाहिले तर मुस्लीम मतदार, माळी समाजाचं मतदान आणि कात्रज भागात जे लोक मला मानतात त्यांचे मतदान प्रशांत जगतापांच्या पाठीशी आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचा जो विचका झालाय त्यामुळे पुण्यात निवडणुकीचं वातावरण कुठेच दिसत नाही. नागरिकांना प्रचंड राग आहे. भाजपावर राग आहे. भाजपाच्या माध्यमातून या कुरघोड्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना निवडणुकीत रस राहिला नाही. खडकवासल्यात सचिन दोडके यांच्यामागे मतदार उभे राहतील. दोन्हीकडे चांगले मतदान होऊन हडपसर, खडकवासला इथं तुतारीचे आमदार होतील असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले जयंत पाटील?
आमचं घड्याळ चोरीला गेलंय, जेव्हापासून तुतारी हाती आली तेव्हापासून तुतारी महाराष्ट्रभर घुमतेय. तुतारी चिन्हावर उभे राहिले तर निवडून येते असं सगळ्यांच्या लक्षात येते. आज व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते आहेत, वसंत मोरे इथं बसलेत, तुमच्या हाती मशाल आहे. आम्ही तुमच्या हातात तुतारी कधीही देऊ शकतो. माझे ते आवडते नेते आहे, त्यांचे काहीही विधान आले तरी मी बघत असतो. लोकसभेलाही माझे त्यांच्यावर फार लक्ष होते असं विनोदी शैलीत जयंत पाटील यांनी हडपसरच्या सभेत म्हटलं.