जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; "जर तुम्ही घड्याळ..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 07:19 PM2024-11-03T19:19:19+5:302024-11-03T19:21:06+5:30
मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे.
ठाणे - मी जे बोललो ते खरे बोललो, मुंबईच्या भाषेत बोललो. ते घड्याळ आमचं होतं. साहेबांनी मिळवलेले घड्याळ होता. या लोकांनी साहेबांना पक्षाबाहेर काढलं तेव्हा पक्षही घेतला आणि जाता जाता साहेबांच्या हातातील घड्याळही चोरले. आमच्या मुंबईच्या भाषेत त्याला पाकिटमार म्हणतात. घड्याळ चोरलं नसतं तर मी त्यांना पाकिटमार म्हटलं नसते. ते घड्याळ चोरून घेऊन गेलेत. पोलीस पकडतही नाहीत. मी काहीच चुकीचं बोललो नाही त्यामुळे एवढं मनाला लावून घेऊ नका असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर पुन्हा केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, लोकशाही कोणाला कुठे सभा घेण्याची परवानगी आहे. कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या, प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी तयार आहे. तुम्ही साहेबांच्या मरणापर्यंत बोलता, मग आम्ही काय बोलायचे नाही का..तुम्ही ५ दिवसांत तिनदा साहेबांवर बोललात. आर.आर पाटलांबाबत बोलले, मेलेल्या माणसाबद्दल बोलता. साहेबांमुळे तु्म्ही कितीदा वाचलात तरी तुम्ही त्यांच्यावर बोलतात. ८७ वर्षाच्या माणसाला काय दुखत असेल तर तुमचं रक्ताचं नातं होते, तुम्हाला समजायला हवं होते असं आव्हाडांनी म्हटलं.
तसेच साहेबांनी पूर्ण देशात नेलेले घड्याळ, आसाम, उडीसा, केरळ, कर्नाटक, राजस्थान, मेघालय तिथे घड्याळ चिन्हावर निवडून आमचे आमदार होते. तुम्ही खोटेनाटे नाटक करून ते घड्याळ चोरले. माझी बायको काय म्हणाली मला आठवत नाही, मला आयुष्यात जे काही मिळाले ते फक्त आणि फक्त शरद पवारांमुळे मिळाले. हे मी कायम बोलत आलोय. मी शरद पवारांमुळे आहे. मला भुजबळांनी खूप मदत केली. प्रफुल पटेलांनी केली असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
दरम्यान, कायम मला हिडीस पीडिस वागणूक देणारे, कॅबिनबाहेर उभे ठेवणारे, हे मी काही विसरलो नाही. मला सगळं लक्षात आहे. साहेबांनी जेवढं प्रेम दिले तेवढे प्रेम मला कुठे मिळाले नाही. माणूस प्रेमाचा भुकेला असतो. पैसे येतात, जातात पण साहेबांसारखे प्रेम मिळणे भाग्य लागतं. कोण कोणाला खुश करतंय हे बारामतीकर व्यवस्थित ओळखतात. बारामतीकर साहेबांच्या तालिमात तयार झालेले आहेत असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लगावला.