विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बीड जिल्ह्यात मोठी खेळी केली आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ज्योती मेटे यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान, ज्योती मेटे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे बीड जिल्ह्यामधील राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या की, हा पक्षप्रवेश करण्यामागे विधानसभा निवडणुकीचंच कारण आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे राजकारण आणि समाजकारण. आमची जी संघटना आहे ती समाजकारण करते. तिचं उद्दिष्ट हे समाजकारण आहे. समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड देण्यासाठी हा पक्षप्रवेश केला आहे. मी बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी प्रस्ताव मांडलेला आहे. तसेच पक्षाशी चांगली चर्चा झालेली असल्याने आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढे जात असताना पक्षाने दिलेली जबाबदारी शिवसंग्राम संघटना सक्षमतेने पार पाडेल, असेही त्यानी सांगितले.
विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या ज्योती मेटे या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी त्यांनी या निर्णयापासून माघार घेतली होती. दरम्यान विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर ज्योती मेटे ह्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. तसेच त्या बीड विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेतलेली असल्याने त्याचाही प्रभाव या भागात पडण्याची शक्यता आहे. आता शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार का? तसेच उमेदवारी मिळाल्यास त्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.