महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली 'बटेंगे तो काटेंगे' ही घोषणा जबरदस्त चर्चेत आहे. या घोषणेवरून अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात बोलताना भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या, "आता सर्वसामान्यांनाही 'बटेंगे तो काटेंगे'ही घोषणा समजू लागली आहे. ही घोषणा आपल्या ऐकतेसंदर्भात आहे. आपण कुटुंबातही हेच बोलतो की, सर्वांनी एकत्र राहायला हवे. त्याच पद्धतीने देशही एकजूट असायला हवा. आमचा पक्ष सनातनी पक्ष आहे. आमचा पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. जर आमच्या पक्षाने ठरवले, तर पीओकेलाही सोबत घेऊ. मात्र जे विरोधी पक्ष आहेत, त्यांचा फूट पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. याची स्थिती आता 'खिसयानी बिल्ली खंभा नोचे'," अशी झाली आहे.
"राहुल गांधी पंतप्रधान मोदींना घाबरतात" -याशिवाय काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विधानावर बोलताना कंगना म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी हे आपल्या देशाचे नेते आहेत. आज संपूर्ण देश आणि संपूर्ण जग त्यांच्याकडे आदराने पाहतो आणि आदर करते. राहुल गांधी हे पंतप्रधानांचे यश बघून घाबरतात. पंतप्रधान जे भाषण करतात तेही न बघता करतात आणि राहुल गांधी न पाहता भाषणही देऊ शकत नाहीत, यामुळे ते त्यांच्यावर चिडतात."