पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:34 PM2024-10-26T22:34:37+5:302024-10-26T22:36:46+5:30
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात भाजपातील इच्छुकांची नाराजी जाहीर समोर आली आहे.
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी आज जाहीर झाली. यातील पुणे कसबा पेठ उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. कसबा पेठ मतदारसंघात मागील पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने यांनाच भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीमुळे येथील इच्छुक कुणाल टिळक, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची नाराजी समोर आली आहे. आईची पक्षनिष्ठा भाजपा नेते विसरले अशी भावना कुणाल टिळक यांनी व्यक्त केली.
कुणाल टिळक म्हणाले की, आज भाजपाचा कसबा पेठेतील उमेदवार घोषित झाला आहे. मी मागच्या दीड वर्ष चांगल्याप्रकारे काम करून उमेदवारीची मागणी पक्षाला केली होती. निवडणुकीमुळे खंत वाटते. नाराजी नसली तरी पक्षाचे काम करणार आहे. फक्त आईने जे पक्षनिष्ठेचे काम पक्षासाठी केले ते भाजपा नेते विसरले का, टिळकांना भाजपा विसरलं का असा प्रश्न पडला आहे. मी कुठे कमी पडलो याचा मी अभ्यास करेन. पक्षाकडून मी माहिती घेईन. पुढच्यावेळी ती चूक दुरुस्त करेन. उमेदवार निवडीत निकष काय लावले हे माहिती नाही. पक्षाकडून मला काही निरोप आला नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच चिंचवडमध्ये तुम्ही कुटुंबाला दोनदा उमेदवारी देता मग टिळक कुटुंबाला उमेदवारी का देत नाही हा प्रश्न आहे. मी वरिष्ठांकडे प्रश्न घेऊन जाईन. आम्हाला काही स्पष्टता आली तर बदल काय करायचे हे कळेल. उमेदवार निवडीआधी मी पक्षाला सांगितले होते, यावेळी भाजपाला खूप जिंकण्याची आशा आहे. ज्याप्रकारे संघटनेने काम केले, लोकांपर्यंत पोहचले त्यामुळे भाजपाच्या बाजूने वातावरण होते. मला जे पक्ष जबाबदारी देईल ते मी करेन. उमेदवार निवडीसाठी प्रयत्न करेन असंही कुणाल टिळक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे हेदेखील कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने धीरज घाटे नाराज झालेत. तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदुत्वासाठी देणारा उमेदवार म्हणून नकोय अशी फेसबुक पोस्ट त्यांनी टाकली आहे. त्यामुळे कसबा पेठ मतदारसंघात भाजपाला येत्या काळात फटका बसणार का अशी चर्चा आता होऊ लागली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. आता पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.