Maharashtra Assembly Election 2024 OBC Vs Maratha Reservation News: जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी वाढत असल्याचे दिसत आहे. तर महायुतीच्या काही जागा सोडल्यास बाकी जागावाटप जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत असून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने महायुती सरकारवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. यातच ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून, मनोज जरांगे यांच्याविरोधात निवडणूक रिंगणार उतरण्याची तयारी लक्ष्मण हाके यांनी दर्शवली आहे.
मीडियाशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर सडकून निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांची यादी येऊ द्या. मनोज जरांगे मेळावे भरवत आहेत. जत्रा भरवत आहेत. ही जत्रा निवडणूक लढण्यासाठी आहे की, आरक्षण मिळण्यासाठी आहे की, ओबीसी नेत्यांना पाडण्यासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देण्यासाठी आहे, हे लवकरच कळेल, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
मनोज जरांगे सुपारीबाज नेते, मविआच्या अजेंड्यावर चालणारा माणूस
मनोज जरांगे सुपारीबाज नेते आहेत. महाविकास आघाडीची सुपारी घेऊन लोकसभेला त्यांनी नेते पाडलेले आहेत. परंतु, विधानसभेला आता मनोज जरांगे पाटील लढणार नाहीत. तेवढी त्यांच्यात हिंमत नाही. शरद पवार जसे सांगतील, तसे चालणारा हा माणूस आहे. पृथ्वीराज चव्हाण जसे सांगतील, तसे चालणारा हा माणूस आहे. महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर चालणारा हा माणूस आहे, या शब्दांत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला.
शरद पवारांच्या तुतारीला एकही मतदान ओबीसींचे जाणार नाही
आमच्या ओबीसींबद्दल जे आमदार भूमिका घेणार नाहीत. जे पक्ष भूमिका घेणार नाहीत. जे नेते भूमिका घेणार नाहीत, त्यांना मतदान करायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांच्या तुतारीला एकही मतदान ओबीसींचे जाणार नाही. सोलापूरमध्ये कितीही ओबीसींची माणसे दिली, तरी आमचे त्यांना सांगणे आहे की, तुम्ही ज्या माणसाच्या निवडणूक चिन्हावर लढणार आहात, त्यांना ओबीसींबाबतची भूमिका आधीच विचारून घ्या, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
दरम्यान, लक्ष्मण हाके निवडणूक लढवणार नाही. पण एकाच अटीवर. जिथे मनोज जरांगे निवडणूक लढतील, तिथे हाके निवडणुकीला उभे असतील. जरांगे लढणार नसतील, तर हाके लढणार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसींची माणसे जास्तीत जास्त कशी निवडून जातील, यावर मी काम करणार, असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.