नागपूर - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतरं मोठ्या प्रमाणात होत आहेत. कोण कुठल्याही पक्षात जाईल याचा नेम नाही. त्यात अवघ्या ५ दिवसांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणारे नेते आता पुन्हा स्वगृही परतणार आहे. विशेष म्हणजे वंचितमध्ये प्रवेश करताच या नेत्याला उमेदवारी मिळाली, पक्षाचा एबी फॉर्मही मिळाला. परंतु उमेदवारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी फॉर्म भरला नाही. हे नेते आहेत अनिस अहमद..
अनिस अहमद यांनी २८ ऑक्टोबरला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या ५ दिवसांनी अनिस अहमद काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. अनिस अहमद हे काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले आहेत. अनिस अहमद म्हणाले की, मी मागील ४४ वर्ष काँग्रेसचं काम करतोय, मी पक्ष सोडला नाही, मी काँग्रेसमध्ये असताना दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म आणला. काही तांत्रिक कारणाने मी वेळेत अर्ज दाखल करू शकलो नाही. मला काही वेळ राग आला होता. दुसऱ्या पक्षाचा फॉर्म आणला. पण मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मानणारा आहे. सोनिया गांधी या माझ्या गॉडमदर आहेत. काँग्रेसमधून मी राजीनामा दिला नाही, काँग्रेसमध्ये असतानाच वंचितचा एबी फॉर्म आणला होता असं त्यांनी सांगितले.
तसेच मी अर्ज भरायला गेलो होतो, परंतु मला १ मिनिटे उशीर झाला. जेव्हा मी अर्ज भरायला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचलो तेव्हा तिथे माझ्यासमोर दार बंद झाले. कदाचित माझ्या नशिबात काही दुसरं चांगले लिहिले असेल. उद्या कदाचित काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी वंचित आघाडी मदत करेल. प्रकाश आंबेडकरांना आम्ही आमच्यासोबत घ्यायला तयार आहोत, ते आमच्यासोबत येत नाही. माणसाला राग येतो, तेव्हा तो काहीही करू शकतो. २४ तासांनी राग शांत झाल्यानंतर मी काँग्रेसमध्ये पुन्हा परतलो. मला काँग्रेसने सर्वकाही दिले आहे असं अनिस अहमद यांनी म्हटलं.
का झाले होते नाराज?
अनिस अहमद यांनी मध्य नागपुरातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती पण गेल्यावेळी फक्त चार हजाराने पराभूत झालेले अ. भा. युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे अहमद नाराज झाले होते. काँग्रेसने पूर्व विदर्भात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. मुस्लिमांनी फक्त काँग्रेसला मतेच द्यायची का, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर मागील सोमवारी मुंबई येथे राजगृहावर जाऊन वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. अनिस अहमद यांनी यापूर्वी आमदार म्हणून दोन वेळा मध्य नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे.