ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:22 AM2024-11-01T06:22:34+5:302024-11-01T08:09:11+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : आम्ही कामाला लागलो असून, महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडोबांनी डोके वर काढल्याने दोन्ही बाजूंकडील दिग्गज नेते मंडळी ऐन दिवाळीत त्यांना थंड करण्याच्या मोहिमेवर आहेत. अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू असलेले हे घमासान आता पुढील चार दिवस कायम राहणार असून, नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील.
आम्ही कामाला लागलो असून, महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला. महाआघाडीने हा बंडोबांचा चांगलाच धसका घेतला असून, काँग्रेससह उद्धवसेना, शरद पवार गटाची नेते मंडळींकडून गुरुवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार वाटाघाटी सुरू होत्या. परळीतील बंडखोर राजेभाऊ फड यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतल्याचे समजते.
बंडखोरी राहणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस
महायुतीत एकमेकांविरोधात काही ठिकाणी क्रॉस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझी संयुक्त बैठक झाली. एकमेकांविरोधातील अर्ज हे मागे घेण्यात येणार आहेत. काही ठिकाणी बंडखोरी आहे. महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चेन्नीथलांचा वॉच, शरद पवारांकडून मनधरणी
- काँग्रेसने काही बंडखोरांशी फोनवर संपर्क केला, तर काही बंडखोरांशी नेत्यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला स्वतः मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
- बंडखोरांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी पक्षाने विभागवार नेत्यांना वाटून दिली आहे. यात विदर्भात नाना पटोले, विजय वडेट्टीवार तर बाळासाहेब थोरात खान्देशात, पृथ्वीराज चव्हाण व सतेज पाटील पश्चिम महाराष्ट्रात, अमित देशमुख मराठवाड्यात, मुंबईत वर्षा गायकवाड यांना जबाबदारी आहे.
- उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोरांना फोन करून समजूत काढली जात आहे, तर काही ठिकाणी विभागप्रमुख, स्थानिक खासदार आणि पदाधिकारी संपर्कात असल्याचे, उद्धव सेनेतील एका नेत्याने सांगितले. गरज पडल्यास काही बंडखोरांशी उद्धव ठाकरेही चर्चा करणार असून, त्यासाठी काही बंडखोरांना मुंबईत भेटीसाठी बोलावले जाऊ शकते.
- शरद पवार गटाकडूनही मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. काही बंडखोरांना शरद पवारांच्या भेटीसाठी बोलावले जात आहे.
बोरिवली मतदारसंघातून बंडखोरी केलेले गोपाळ शेट्टी यांची विनोद तावडे यांनी घरी जाऊन भेट घेतल्याचे समजते. तसेच शेट्टी हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांची समजूत काढू, असे फडणवीस म्हणाले.
माहीममधील शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी अशी एकत्र बोलणी सुरू असून, नक्की मार्ग काढू, असेही फडणवीस म्हणाले.