विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 06:32 AM2024-10-31T06:32:49+5:302024-10-31T08:40:29+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : सरकार आल्यावर या ५ जागा भरल्या जातील आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन मविआचे नेते देत असल्याची माहिती काही बंडोबांनीच दिली.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : आपण सत्तेवर आल्यावर तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी देतो, महामंडळ देतो, अशी आश्वासने देऊन महाविकास आघाडीचे नेते बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ७ जागा महायुती सरकारने नुकत्याच भरल्या आहेत, तर ५ जागा रिक्त आहेत. सरकार आल्यावर या ५ जागा भरल्या जातील आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन मविआचे नेते देत असल्याची माहिती काही बंडोबांनीच दिली.
बंडखाेरांशी संपर्क
काँग्रेसमधील बंडखोरांना शांत करण्यासाठी राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला आणि ज्येष्ठ नेते अशोक गहलोत प्रयत्न करत आहेत. दिवसभरात या दोन नेत्यांनी मुंबई आणि लगतच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा केल्याचे समजते. तर उद्धव सेनेकडून खा. संजय राऊत, शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे बंडखोरांच्या संपर्कात आहेत.
जिथे मित्र पक्षांविरोधात अधिकृत उमेदवार आहे तिथे कुणी माघार घ्यायची यावर मविआच्या नेत्यांची बैठक होऊन त्यातून हा प्रश्न निकाली काढला जाऊ शकतो.