कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा म्हणजेच ४ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता. बंडखोर उमेदवारांच्या माघारीचा हा दिवस कोल्हापुरात अधिकृत उमेदवाराच्या माघारीने गाजला. काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वीच निवडणूक रिंगणातून माघार घेऊन सर्वांना धक्का दिला.
मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, काँग्रेसने आपली उमेदवारी पुरस्कृत करावी, अशी मागणी राजेश लाटकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत सतेज पाटील यांनी आपण आज, मंगळवारी निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँगेस राजेश लाटकर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सतेज पाटील यांची तीव्र नाराजीमधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली."दम नव्हता, तर निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं ना मग, मी पण माझी ताकद दाखविली असती", अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या माणिक मंडलिक यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. मधुरिमांच्या अनपेक्षित माघारीमुळे काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार कोल्हापूर उत्तरमध्ये असणार नाही. त्यामुळे काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस गायब झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय महाडिक यांनी लगावला आहे.
लाटकरांचे तिकीट कापून मधुरिमाराजेंना संधीकोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून काँग्रेसने आधी राजेश लाटकर यांना तिकीट दिले होते. मात्र काही नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला.तसेच, यासंबंधीचे पत्र या नगरसेवकांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना दिले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना तिकीट दिले. मात्र, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता सतेत पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.