गुहागर - कोकणात कधीही आलं तरी हे कोकण भुरळ घालतं. ७५० किमी समुद्रकिनारा लाभलेलं हे कोकण, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. जे परमेश्वराने आपल्याला दिलंय त्याकडे आपलं लक्ष नाही. फक्त पर्यटनावर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात. तुम्ही कल्पना केली नसेल इतकं सुंदर कोकण होऊ शकतं. तुम्हाला गाव सोडावं लागणार नाही, तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सगळे इथेच मिळेल असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणच्या जाहीरसभेत सांगितले.
गुहागर येथे मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले की, परदेशात ज्याप्रकारे समुद्रकिनारे विकसित झालेले पाहतो, पण परमेश्वराने हे कोकणाला दिलं मग आपल्याकडे का होत नाही, चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिली, ज्यांनी स्वत: काही केले नाही. आपापली खळगी भरत आले. मोठे झाले, यांचे अनेक फार्म हाऊस झाली, कोकणात उद्योगधंदे नसल्याने तरुण मुंबई, पुण्याकडे निघून जातात. विदर्भ, मराठवाडा सगळीकडे हेच. दर ५ वर्षांनी निवडणूक येते, आज इथं चिमुरडी बोर्ड घेऊन थांबलीय, ५ वर्षाने तिचे वय वाढेल. किती वर्ष आपण त्याच त्याच विषयावर निवडणूक लढवणार आहोत, प्रत्येकजण सांगतो, रोजगार आणू मग आतापर्यंत का आणला नाही. निवडून दिलेल्या आमदारांना तुम्ही प्रश्न विचारत नाही. इथली माणसं मुंबई, पुण्यात का जातायेत हे का विचारले जात नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.
तसेच केरळात जा, अख्खं राज्य पर्यटनावर सुरू आहे, तिथे कुठे रिफायनरी आली, पर्यटनावर गोवा राज्य सुरू आहे. इतकं सुंदर कोकण करता येईल. ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ना तुम्हाला घर सोडावे लागेल, ना गाव सोडावे लागेल, तालुका सोडावा लागेल, तुम्हाला जे काही असेल इथेच मिळेल. आतापर्यंत हे का झाले नाही कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच पक्षांना निवडून देता. तुम्ही खासदार, आमदार निवडून देता, दिल्लीत खासदार कोणते प्रश्न मांडतात, कोकण पर्यटनावर किती प्रश्न मांडले गेले. कोकणाचा कॅलिफोर्निया करू असं राजकारणी बोलत होते, पण त्याचे पुढे काय झाले. आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल. राज ठाकरे हा ओरडून तुम्हाला सतत सांगतोय, तुम्ही महाराष्ट्राचे नागरीक आहे. ज्याचा इतिहास एवढा मोठा, स्वाभिमानी कणा राज्याचा मोडून टाकला. आपल्याला काही दु:ख नाही. आज तुम्ही असे वागता, म्हणून हे राजकारणी असे वागतात. तुमचा विचार नाही, राज्याचा विचार नाही. काय उद्योग आपल्याकडे आले पाहिजे याचा विचार नाही. फक्त राजकारणात गुंतले गेलेत. ५ वर्ष तुम्ही तमाशा बघताय, इथला पक्ष तिथे जातो, तिथला पक्ष इथे येतो, हे आमदार विकले जातात वैगेरे हे ५ वर्ष तुम्ही पाहताय. सगळे टोकदार प्रश्न मनसेला विचारले जाणार बाकीच्यांना प्रश्न विचारताना बोथट झाली आहे असं संतप्त भावना राज यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एकेकाळी पत्रकार, संपादकांना राजकारणातील लोक घाबरायचे. एक भीती असायची, आता कुणाबद्दल राजकारण्यांना भीती उरली नाही. जनतेची भीती नाही मग पत्रकारांना का घाबरणार, उन्हातान्हात तुम्ही रांगेत उभं राहून त्याच त्याच लोकांना मतदान करणार मग ते का घाबरतील. माणसे जिवंत आहेत की पुतळे आहेत हेच कळत नाही. नुसते जाताय आणि मतदान करताय, आमचा जो काही प्रदेश आहे त्यात तुम्ही काय केले हे विचारावे वाटत नाही. तुम्ही थंड बसला आहात, तुम्हाला स्वत:ला विकास म्हणजे काय हे माहिती नाही. तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुम्ही त्याच त्याच गोष्टी ऐकून मतदान करता, नेमका विकास म्हणजे काय असतो हे निवडणूक झाली ना मी तुम्हाला इथं येऊन दाखवणार आहे. नाशिकमध्ये आम्ही जे काम केले, तिथे लोकांना आता मनसेला मत न देऊन चुकल्यासारखे वाटतंय, नाशिकमध्ये आमच्या ५ वर्षाच्या काळात ना त्याच्या आधी काम झाले होते, ना आता कुणी करत आहे. आमचा कोकणचा रस्ता १७-१८ वर्ष झाली, सुरूच आहे. आम्हाला राग येत नाही. काही वाटत नाही. दरवर्षी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे रस्त्यावरील खड्डे पडलेले दाखवतात. नाशिकमध्ये रस्त्यावर खड्डे पडलेत का ते बघा. नाशिकमधील रस्त्यांवर खड्डे सापडणार नाहीत. ज्यावेळी रस्त्यांची कंत्राटे दिली, तेव्हा आयुक्तांसमोर कंत्राटदारांना बोलावले, तुम्हाला कंत्राटे दिली जातायेत, तुम्हाला कुणी पैसे मागितले का विचारले. हे सगळी कंत्राटे तुम्हाला दिल्यानंतर जर मला रस्त्यात खड्डा दिसला तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असं त्यांना बजावले असंही राज ठाकरेंनी सांगितले.
कोकणात ताकद, पण पक्ष आणि तीच तीच माणसं बदलावी लागतील
कोकणातील रस्त्यांबाबत नितीन गडकरींना मी फोन केला. इतकी वर्ष रस्त्याचे काम होत नाही, वाहतूक कोंडी होते, खड्ड्यांमुळे लोकांना त्रास होतोय, तुम्ही महाराष्ट्रातले, आमचा रस्ता चांगला का होत नाही विचारले, तेव्हा ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, कंत्राटामध्ये टक्केवारी होते, त्याच्याकडे पैसे उरले नसतील. अनेक कारणे असतील पण रस्ता झाला नाही. आमचा कोकणी माणूस साधा, भोळा आहे, कुणाला काही प्रश्न विचारत नाही. तो शोषित आहे. न चिडणाऱ्या, संवेदना नसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. तुम्हाला यात सुख मानायचे असेल तर माना. प्रगती काय असते, विकास काय असतो हे एकदा राज ठाकरेंच्या हाती सत्ता देऊन बघा, केरळ, गोवा सगळ्यांना मागे टाकून आपण पुढे जाऊ, इतकी ताकद कोकणात आहे. कोकणात पक्ष बदलावे लागतील, माणसे बदलावी लागतील. त्याच त्याच लोकांना मत देऊन तुमच्या हाती काय लागणार नाही असं कळकळीचं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केले.