आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:54 AM2024-11-05T11:54:53+5:302024-11-05T11:56:29+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : बावडा रोडवरील मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ करवीरनगरीतून होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे दहाही उमेदवार मंगळवारी सायंकाळी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर बावडा रोडवरील मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह महायुतीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी सभेच्या तयारीची पाहणी केली. दरम्यान, महायुतीची पहिली जाहीर सभा होणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याआधी २०१४ साली महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ इचलकरंजीतून करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे.
कोल्हापूरमध्ये महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, नुकतेच भाजपमध्ये आलेले आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर अशी सत्तारूढ मंडळी आहेत. यांच्यासह अन्य उमेदवारांवर ही पहिली प्रचार सभा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.