- हणमंत पाटील सांगली - शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातच त्यांना घेरण्याची रणनीती महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी आखली आहे. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा ऐन निवडणुकीत अजित पवार गटात प्रवेश घडवून आणण्याची खेळी राज्याच्या नेत्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पाठीशी राहिले. इतर मातब्बर नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे अजित पवार गटाच्या टार्गेटवर जयंत पाटील आहेत. २०१९ च्या निवडणुकीत बंडखोरी करून दुसऱ्या क्रमांकाची मते निशिकांत पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे महायुतीतइस्लामपूरची जागा शिंदेसेनेऐवजी अजित पवार गटाला देण्यात आली. जयंत पाटील यांचे पूर्वीचे घड्याळ चिन्ह आता त्यांच्या विरोधात वापरले जाणार आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे...- पेठ इस्लामपूर ते सांगली रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले. परंतु, रुंदीकरण धिम्यागतीने सुरू असल्याची टीका होत आहे.-मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे झालेली नाहीत. तसेच, इस्लामपूर शहरात दर्जेदार मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची टीका विरोधक करीत आहेत.सहकारी साखर कारखाने, बँका व संस्थांचा विस्तार झाला. परंतु, औद्योगिक विकास वेगाने होताना दिसत नाही. त्यामुळे नवीन उद्योग व रोजगारनिर्मिती थंडावली आहे. - बारामती मतदारसंघाप्रमाणे इस्लामपूर मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न कधी पूर्ण होणार आहे, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.