महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबत मोठमोठ्या जाणकारांनाही काही ठामपणे सांगता येत नाहीये. दरम्यान, नुकत्यात समोर आलेल्या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रात महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली असून, अजित पवार यांनी महायुतीला १७५ हून अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे. तसेच बारामतीमध्ये आपल्याला १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रचार दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीला मिळणाऱ्या जागांबाबत अंदाज व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत १७५ हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य आम्ही समोर ठेवलं आहे. त्यासाठी महायुतीमधील प्रत्येक घटकपक्ष प्रयत्नशील आहे. तशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, महायुतीमधील आम्ही तीन प्रमुख पक्ष त्यासह रामदास आठवले यांचा पक्ष आणि इतर मित्रपक्ष यांच्यामध्ये व्यवस्थित समन्वय आहे का, याबाबत आमची चर्चा झाली. राष्ट्रवादीने काय केलं पाहिजे, भाजपानं काय केलं पाहिजे, शिवसेनेनं काय केलं पाहिजे, इतरांनी काय केलं पाहिजे, याबाबतची ती चर्चा होती. तसेच कुणाच्या कुठे सभा घ्यायच्या, याबाबतची चर्चा आम्ही केली.
दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलमधून विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रामध्ये १४५ ते १६५ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात १०६ ते १२६ जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीली ४७ टक्के तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मतं मिळलीत. इतर छोट्या पक्षांना १२ टक्के मतं मिळू शकतात, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला होता.