Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:20 PM2024-10-19T14:20:35+5:302024-10-19T14:26:07+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊन चार दिवस उलटले पण अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप झालेलं नाही. याबाबत बैठकांचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, आता महायुतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महायुतीचे मुंबईतील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन जागा सोडण्यात येणार आहेत. अनुशक्ती नगर, वांद्रे पूर्व, शिवाजी मानखुर्द हे तीन विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपाला १८ जागा सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीमध्ये मुंबईतील ३६ जागांवरील फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. मुंबईत भाजपाला १८ जागा सोडण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत १५ जागा लढणार असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचे मुंबईतील जागावाटप
भाजप १८
शिवसेना १५
राष्ट्रवादी काँग्रेस ३
दरम्यान, आता राज्यातील जागावाटपाबाबत महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरुच आहे. काही ठिकाणी महायुतीमध्ये भाजपाचे नेते घड्याळ चिन्हावर निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे, सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणूक लढवणार आहेत तर वाळवा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपाचे निशिकांत पाटील निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात
उमेदवारी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
भाजपची पहिली यादी दोन दिवसांत?
भाजपमध्ये दोन डझन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे.
ही रणनीती अंमलात आणण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आली आहे. त्यातील बहुतेकांनी उमेदवार यादी जाहीर करण्याची घाई करू नका, असे मत दिले आहे.
भाजपची पहिली यादी गुरुवारीच जाहीर केली जाणार होती, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ती अडली आहे. तरीही, आमची पहिली यादी दोन दिवसांत येईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.